सांगली पोलिसांच्या ताब्यातून दोन आरोपी पळाले

27

सामना प्रतिनिधी । सांगली

चोरीप्रकरणी सांगली पोलिसांनी अटक केलेले अमोल भंडारे व अनिकेत कोथळे या दोघांनी सोमवारी रात्री ठाण्यातून पलायन केल्याची घटना घडली. यामधील भंडारे याला निपाणी येथे ताब्यात घेण्यात आले असले, तरी कोथळेचा थांगपत्ता अद्यापि लागलेला नाही. दरम्यान, कोथळे याच्या नातेवाईकांनी त्याचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करीत सांगली शहर पोलीस ठाण्यासमोर दिवसभर ठिय्या मारला. यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले व अनेक वेळा वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी घातपाताचा इन्कार केला असून, चौकशीसाठी पथके रवाना केल्याचे स्पष्ट केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कवलापूर येथील अभियंता संतोष महेंद्र गायकवाड (३५) यांना चाकूचा धाक दाखवून दोन हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल लंपास केला होता. रविवारी पहाटे घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनेचा छडा लावत अनिकेत अशोक कोथळे (२६) आणि अमोल सुनील भंडारे (२३, दोघे रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) यांना अटक केली होती. न्यायालयाने दोघांना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी लॉकअपमध्ये ठेवले होते. रात्री उशिरा त्यांना तपासाच्या नावाखाली गुन्हे शाखेमध्ये चौकशीसाठी बाहेर काढले होते. त्यांच्यासोबत पोलीस उपअधीक्षक युवराज कामटे होते. मात्र, दोघेही हिसका मारून पळून गेले. त्याबाबतची फिर्याद तपास अधिकारी कामटे यांनी दिली. पोलिसांच्या ताब्यात असलेले दोन्ही आरोपी पळून गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.

पोलीस ठाण्यातून संशयित आरोपी कोथळे आणि भंडारे पळून गेल्याची माहिती सोमवारी सकाळी दोघांच्या कुटुंबीयांना समजली. शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कोथळे याचे नातेवाईक आले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपी हिसका मारून तावडीतून पळून गेले आहेत. त्यांच्या शोधासाठी पथक रवाना झाले असल्याचे सांगण्यात आले. ‘आमचा मुलगा पळून गेल्याचे तुमच्या सीसीटीव्ही कॅमेऱयात असेल. त्याचे फुटेज आम्हाला दाखवा,’ अशी मागणी कोथळे कुटुंबीयांनी केली. मात्र, पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. वेगवेगळी कारणे सांगितली जात असल्याने कुटुंबीयांना संशय आला. पोलीस ठाण्यासमोर कोथळे याच्या आईसह भावाने ठिय्या मारला. पोलिसांकडून व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने आपल्या मुलाचा घातपात झाला असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त करीत आक्रोश केला. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर चांगलीच गर्दी जमली होती. नगरसेवक युवराज बावडेकर, बाळासाहेब गोंधळी, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी पोलीस अधिकाऱयांना संशयित आरोपी कोथळे याच्याबाबत विचारणा केली. रात्री उशिरापर्यंत कोथळे याच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने ‘रास्ता रोको’ करण्यात आला. वातावरण तणावपूर्व बनल्याने दंगलविरोधी पथक, गुंडाविरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक बोलाविण्यात आले. पोलिसांनी नागरिकांना हुसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोथळे कुटुंबीयांनी आक्रमक होत ‘रास्ता रोको’ केला.

कामटे यांचा मोबाईल बंद, पथक गायब

चोरी प्रकरणातील तपास अधिकारी युवराज कामटे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा मोबाईल बंद होता. त्यांच्या पथकातील हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, सूरज मुल्ला यांचे पथकही गायब झाले होते. परंतु पथक संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱयांचा मोबाईल बंद आणि पथकातील हवालदार गायब झाल्याने घातपाताचा संशय असल्याची चर्चा उपस्थित नागरिकांत सुरू होती. दरम्यान, पोलीस ठाण्यास आमदार सुधीर गाडगीळ आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी भेट देऊन घटनेबाबतची माहिती घेतली.

पोलीस उपअधीक्षक डॉ. काळे यांनी चोरीप्रकरणी अटकेत असलेले आरोपी पळून गेले असल्याची फिर्याद नोंदविण्यात आली असून, नातेवाईकांच्या आरोपात कोणतही तथ्य नसल्याचे सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे बंद का होते? याबाबतची चौकशी केली जाईल. या प्रकरणाबाबत कोणीही संशय घेण्याचे कारण नाही. आरोपी पळून गेल्याबाबत पोलीस उपनिरीक्षक कामटे यांच्यावर पोलीस अधीक्षक कारवाई करतील, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या