कुर्डुवाडीत अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त, सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेषांतर करून दोघांना केली अटक

500 रुपये मूल्याच्या अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी 500 रुपयांच्या 493 नोटा हस्तगत केल्या आहेत. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी वेषांतर करून ही कारवाई केली आहे.

हर्षल शिवाजी लोकरे (वय 20, रा. कंदर, ता. करमाळा) व सुभाष दिगंबर काळे (वय 36, रा. भोसरे, ता. माढा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. माढा न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हवालदार आबासाहेब मुंढे यांनी फिर्याद दिली आहे.

कुर्डूवाडी परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन बाजारात खपविण्यासाठी येणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांना मिळाली होती. या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हार विक्रेत्याचा वेष धारण करून हार विकत टेंभुर्णी चौकात पाळत ठेवली होती.

मिळालेल्या माहितीतील वर्णनाप्रमाणे एक तरुण दुचाकीवरून बॅग घेऊन निघाला होता. तो दिसताच पोलिसांनी गराडा घालून त्याला पकडले. तपासणीत त्याच्याकडे 500 रुपयांच्या हुबेहूब सुमारे अडीच लाख रुपयांच्या नोटा मिळून आल्या. त्यावरील महात्मा गांधी यांचा फोटो, वॉटरमार्कदेखील होता, पण नोटेचा कागद हलक्या प्रतीचा मिळून आला. तसेच एकाच नंबरच्या दोन नोटा आढळून आल्या. या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता भोसरे येथील सुभाष काळे याने या नोटा दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कुर्डूवाडीपासून टेंभुर्णीच्या दिशेने 15 किलोमीटर अंतरावर जाऊन काळे याला पकडले. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी केली जात आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोरे यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहायक उपनिरीक्षक नीलकंठ जाधवर, श्रीकांत गायकवाड, बिराजी पारेकर, हवालदार सर्जेराव बोबडे, आबासाहेब मुंढे, विजय भरले, सलीम बागवान, हरिदास पांढरे, पोलीस नाईक रवी माने, कॉन्स्टेबल विनायक घोरपडे, चालक कॉन्स्टेबल दिलीप थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कुर्डूवाडी पोलिसांना मागमूसही नाही

अडीच लाखांच्या बनावट नोटा घेऊन बाजारात खपविण्यासाठी आणल्या जातात. त्यावर सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग वेषांतर करून कुर्डूवाडी शहरात सापळा रचून बनावट नोटांसह दोघांना ताब्यात घेते. मात्र, शहर पोलिसांना याची साधी खबरसुद्धा लागत नसल्याची चर्चा शहरात जोरदारपणे सुरू होती.