मित्राचा खून करणाऱ्या दोघांना अटक

35

सामना प्रतिनिधी । पुणे

येरवड्यात झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा पोलिसांनी उलगडा करत दोन मित्रांना अटक केली. यातील एक अल्पवयीन आहे. दारूच्या नशेत त्याने शिवीगाळ केल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नितीन कडाळे (वय २४) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी अजिंक्य विजय कांबळे याच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

नितीन कडाळे, अजिंक्य कांबळे आणि अल्पवयीन मुलगा हे तिघे मित्र आहेत. मंगळवारी रात्री हे तिघे येरवडा येथील मेंटल रुग्णालयाच्या मैदानावर दारू पित बसले होते. दारू पिताना नितीनने दोघांना त्यांच्या आई-वडिलांवरून शिवीगाळ केली. त्यावरून त्यांच्यात भांडणे झाली. या दोघांनी रागाच्या भरात नितीनचा दगडाने ठेचून खून केला.

हा खून होण्याआधी नितीन त्याच्या दोन मित्रांसोबत बाहेर गेल्याचे काहीजणांनी पाहिले होते. त्यावरून तपास केला असता, त्यांनीच खून केल्याचा संशय होता. येरवडा पोलिसांनी याचा तपास करून दोघांना येरवडा परिसरातील बंगला क्रमांक पाच येथून ताब्यात घेतले असता, त्यांनी खून केल्याची कबुली दिली. कांबळे आणि या अल्पवयीन मुलावर यापूर्वी मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अनिल लोहार करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या