Viral : ‘मृत मुलं पुन्हा जिवंत होतील’, दोन सख्ख्या भावांचे मृतदेह रात्रभर मिठात गाडले

949
प्रातिनिधिक फोटो

व्हायरल मेसेजचा परिणाम काय होतो हे आपण अनेक ठिकाणी जमावाने चोर समजून केलेल्या हत्यांच्या घटनांमधून पाहिलेला आहे. परंतु आता मात्र मृत्यूनंतरही हा व्हायरल मेसेज पाठ सोडत नसल्याचा प्रकार इंदूरमध्ये समोर आला आहे. येथे मृत भावांचे मृतदेह सरकारी आरोग्य केंद्रात रात्रभर मिठात गाडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मिठात मृतदेह गाडल्याने व्यक्ती पुन्हा जिवंत होतो असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मृतकाच्या कुटुंबीयांनी अंधविश्वासाचा खेळ खेळल्याचे समोर आले.

एका हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सांवेर येथे रविवारी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कमलेश (20) आणि हरीश (18) अशी मृतांची नावे आहेत. दोघांचा मृतदेह सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला. यानंतर मृतांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक मेसेज वाचून दोन्ही मृतदेह दोन क्विंटल जाड्या मिठात रात्रभर गाडून ठेवले. या दोन्ही मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, सोमवारी या तरुणांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती चंद्रावती पोलिसांनी दिली.

काय होता मेसेज?
कोणत्याही व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला असेल तर त्याच्या शरीराला जाड्या मिठाने झाकून ठेवा. असे केल्यास मृत झालेला व्यक्ती पुन्हा जिवंत होईल. हाच मेसेज वाचून मृत भावांच्या कुटुंबीयांनी त्यावर विश्वास ठेऊन अंधविश्वासाचा खेळ खेळला. त्यामुळे असे मेसेज व्हायरल करताना कृपया काळजी घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या