दोन भावांनी घेतला सेंद्रिय शेतीचा वसा

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मृणाल डब्बास आणि लक्ष्य डब्बास या दिल्लीतील दोघा भावंडांनी मोठय़ा पगाराची नोकरी सोडून पूर्णवेळ आधुनिक शेतीला वाहून घेतले आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते दोघे ऍग्रो टुरिझमवर आधारित सेंद्रीय शेती करत आहेत. त्यांनी 200हून अधिक शेतकऱयांचे नेटवर्क उभे केले आहे.

त्यातून केवळ दिल्लीच नव्हे तर देशभरात फळं, भाज्या, मध, डाळी, पीठ आदींचा पुरवठा करत आहेत. वर्षाला त्यांची 70 लाख एवढी आर्थिक उलाढाल होत आहे. 30 वर्षीय मृणाल डब्बास सांगतो, रसायनांचा मारा असलेली फळं, भाज्या खाऊन लोकांच्या आरोग्य धोक्यात येते. यावर काहीतरी केलं पाहिजे असं वाटू लागलं. जर स्वतःची जमीन आहे तर आपणच सेंद्रीय शेती करूया, असं मनात आलं.

मृणाल आणि लक्ष्य हे दोघे भाऊ 28 एकरात सध्या शेती करतात. 50हून अधिक जातीची फळं घेतात. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील शेतकऱयांना त्यांनी कमर्शिअल फार्मिंगसाठी प्रशिक्षण दिले आहे.

दोन्ही भावांनी ऍग्रो टुरिझम ही संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे. यात हिरव्यागार शेतांची सहल, सेंद्रीय शेतीची माहिती, तसेच ताज्या भाज्या आणि फळं खाण्याची संधी मिळते.

आपली प्रतिक्रिया द्या