कोकण हादरले! रत्नागिरीत 50 लाखांचे कोकेन, कोस्टगार्डच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

81
two-coast-guard-personnel-held

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी जिह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीमुळे कोकण हादरले आहे. शहरातील एमआयडीसी परिसरात एका पडक्या इमारतीत कोस्टगार्ड कर्मचाऱ्यांमार्फत हरयाणातून विक्रीसाठी आणलेले 50 लाखांचे 936 ग्रॅम कोकीन आज पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी दिनेश शुभे सिंह (23), सुनीलकुमार नरेंद्रकुमार रणवा (26), रामचंद्र तुलीचंद मलिक (51) या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

रत्नागिरी जिह्यात अमली पदार्थांची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असल्याची खबर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळताच पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून एमआयडीसी मिरजोळे परिसरात सापळा रचला. त्यावेळी हर्षा फुड्सकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरील पडक्या इमारतीत तिघेजण आपापसात बोलत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्या तिघांची झडती घेतली असता त्यांना प्लास्टिकच्या पिशवीत पांढऱया रंगाची पावडर दिसून आली. मोबाईल फॉरेन्सिक पथकाने तपासणी करताच 936 ग्रॅम कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. त्याची अंदाजे किंमत 50 लाख रुपये असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी दिली.

दोघे तटरक्षक दलाचे कर्मचारी

कोकेन प्रकरणी पकडलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपी हे तटरक्षक दलाचे कर्मचारी असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. सुनीलकुमार नरेंद्रकुमार रणवा (26)- तिहारी फत्तेपूर जिल्हा शिखर राजस्थान, सध्या राहणार गुलाबवाटिका कारवांची वाडी रत्नागिरी, रामचंद्र तुलिचंद मलिक (51) – गन्नोर जिल्हा सोनपत हरयाणा, सध्या राहणार अंकित प्लाझा सहकारनगर नाचणे, हे दोघे तटरक्षक दलाचे कर्मचारी आहेत. त्यापैकी एक सेलर पदावर तर दुसरा अधिकारी पदावर काम करत आहे. दिनेश शुभे सिंह हा कोकेन घेऊन आला होता. त्यामुळे कोकेन प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रूतली आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या