विरुष्काच्या लग्नात फक्त या दोन क्रिकेटर्सला आमंत्रण

31

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थान क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा त्यांच्या लग्नासाठी इटलीला रवाना झाले असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या हाय प्रोफाईल लग्नात कुणाकुणाला आमंत्रण असेल यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत. पण विराटने फक्त दोनच क्रिकेटर्सना आमंत्रण दिल्याचे समजते. विराटच्या लग्नासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व हिंदुस्थानचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग लवकरच इटलीला रवाना होणार असल्याचे समजते.

हिंदुस्थानची टीम सध्या श्रीलंकेसोबत एकदिवसीय सामन्यात व्यस्त आहे. त्यामुळे टीममधील एकाही सदस्याला आमंत्रण पाठविलेले नाही. त्यामुळे युवराज व सचिन तेंडुलकर यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. सचिन व युवराज हे दोघेही विराटचे खास असून सचिनला तर तो आदर्श मानतो.

विराटने या लग्नाला फार कुणाला बोलावलेले नाही. त्याचे काही खास मित्र व नातेवाईकच लग्नाला उपस्थित असतील. त्याशिवाय विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा लग्नाला उपस्थित राहणार आहेत. क्रिकेट विश्वातील फक्त सचिन आणि युवराजलाच आमंत्रण पाठविण्यात आले आहे. असे कोहलीच्या एका नातेवाईकाने मेन्सएक्सपी या संकेतस्थळाला सांगितले.

विराटसारखेच अनुष्काने देखील फार कुणाला आमंत्रण दिलेले नाही. तिच्या यादीत नातेवाईकांव्यतिरीक्त तिचा सह कलाकार शाहरुख खान, आमीर खान, बॅण्ड बाजा बारात चित्रपटाचा दिग्दर्शक मनीश शर्मा, आदित्य आणि राणी मुखर्जी यांना आमंत्रण दिले आहे.

इटलीतील मिलान येथे विरुष्काचा लग्न सोहळा पार पडल्यानंतर ते दोघे २१ आणि २२ डिसेंबरला त्यांच्या क्रिकेट व बॉलिवू़डमधील मित्रासांठी रिसेप्शन ठेवणार आहेत. असे देखील या संकेतस्थळावर दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या