बीडमध्ये बेपत्ता मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले, कुटुंबियांनी हत्येचा आरोप केल्याने खळबळ

1961

बिंदुसरा नदीच्या पात्राजवळील मळ्यात विहिरीत दोन मृतदेहासह मोटारसायकल आढळून आली. गुरुवारी हे दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले तेव्हा सदर तरूण हे बीड शहरातील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांनी आरोपीला अटक करा असे म्हणत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरालगत असलेल्या कृष्ण मंदिराच्या जवळ आणि बिंदुसरा नदीपात्रा शेजारी असलेल्या मळ्यातील एका विहिरीत दोन मृतदेह तरंगत असल्याची माहिती बुधवारी शहर पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान रात्री साडेआठ नऊ वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु अंधार असल्यामुळे दोन्ही मृतदेह रात्री पाण्याच्या बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले नव्हते. गुरुवारी पुन्हा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. दोन्ही मृतदेह बाहेर काढले तेव्हा दोघांचीही ओळख पटली. बीड शहरातील शाहु नगर भागात राहणारा आकाश श्रीकृष्ण हरनाळे (वय 20) व हॉटेल अतिथीच्या मागे राहणारा कर्नल हिरासिंग शिकलकर (वय 19) अशी त्यांची नावे असल्याचे निष्पन्न झाली. शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कर्नर हिरासिंग शिकलकर याच्या कुटुंबाने हा घातपाताचा प्रकार असून यातील आरोपींना अटक करा अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. एवढेच नव्हेतर त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयातही ठाण मांडले होते.

दोघेही होते बेपत्ता
मयत आकाश श्रीकृष्ण हरनाळे हा बेपत्ता असल्याबाबत 14 जानेवारी 2020 रोजी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती तर कर्नल हिरासिंग शिकलकर हा बेपत्ता असल्याची तक्रार 21 जानेवारी रोजी शिवाजी नगर पोलीस ठाण्यातच दाखल करण्यात आली होती. बुधवारी विहीरीतील मृतदेहाची ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांनी बेपत्ता असल्याबाबतच्या तक्रारींची माहिती गोळा करणे सुरू केले होते.

विहिरीत आढळली मोटार सायकल
कुजलेल्या अवस्थेतील आकाश व कर्नल या दोघांचेही मृतदेह विहिरीच्या बाहेर काढल्यानंतर पोलिसांना विहिरीत एक मोटार सायकल असल्याचे आढळून आले. एमएच 23 यु 3788 या क्रमांकाची मोटार सायकलही अग्निशामक दलाच्या जवानांनी विहीरीतून बाहेर काढली आहे. त्यामुळे मोटार सायकल विहिरीत कशी पडली. दोघेही मोटार सायकलवर होते की अन्य काही या बाबीचा उलगडा पोलीस तपासानंतरच होईल.

आपली प्रतिक्रिया द्या