कसाल – नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना अपघात, मायलेकाचा मृत्यू

कसालजवळ तोरसोळे फाटा येथे देवगडच्या दिशेने येणाऱ्या एका कारला अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. महेश मोहन तोरसकर (48 वर्षे) आणि मनीषा मोहन तोरसकर (78 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. महेश तोरसकर हे तळेबाजार येथील ज्योतिर्लिंग जनरल स्टोअर्सचे मालक असून मनीषा या त्यांची आई आहे. एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. कसाल येथे राहणाऱ्या नातेवाईचे निधन झाल्याने त्याच्यावरील अंत्यसंस्कारासाठी हे तोरसकर निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत गाडीमध्ये गुरुनाथ श्रीराम पारकर आणि त्यांची पत्नी निता गुरुनाथ पारकर हे दोघेही होते.

तोरसोळे फाट्यानजिक धोकादायक वळणावर देवगडचा दिशेने येत असलेल्या ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. अपघातानंतर या ट्रकनेही पेट घेतला. अपघातामध्ये पारकर दाम्पत्य जखमी झाले असून चालकाचा बाजूने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालक महेश तोरसकर व त्यांची आई मनीषा तोरसकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली. उपचारासाठी गुरुनाथ पारकर यांना कणकवली येथे तर त्यांचा पत्नीला गोवा येथे नेण्यात आले आहे. तळेबाजार येथील व्यापारी महेश तोरस्कर आणि त्यांच्या आईचे दुर्दैवी निधन झाल्याने तळेबाजार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.