करोडपती होण्याचं भूत डोक्यात शिरलं, शेतात गांजाचं पिक घेतलं; जालन्यात 2 शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे दोन शेतकर्‍यांना शेतात गांजा लावणे चांगलेच महागात पडले आहे. या दोन्ही शेतकर्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही शेतातून तब्बल 36 लाख 50 हजाराचा 327 किलो ओला गांज्याची झाडे जप्त केली आहे. सोमवारी (28 नोव्हेंबर) ही कारवाई करण्यात आली.

गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असूनदेखील शेतकऱ्यांनी अवैध पद्धतीने गांजाची शेती केली होती. या कारनाम्याची माहिती समजताच टेंभुर्णी पोलिसांनी कारवाई करून तब्बल 327 किलो गांजा आणि गांजाची झाडे जप्त केली आहे. पोलिसांनी गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सुखदेव भाऊराव कापसे आणि अशोक भागाजी कापसे अशी दोन्ही शेतकऱ्यांची नावे आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी इंदल बहुरे यांच्या मार्गदर्शनाखालीॉ टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे, नायब तहसिलदार पप्पुलवाड, पोलीस उपनिरीक्षक सतिश दिंडे, तलाठी उषा म्हस्के, कृषी सहाय्यक विठ्ठल नखोद आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली.