धक्कादायक…कर्जवसुलीसाठी बँकांच्या तगाद्याला कंटाळून साताऱ्यात शेतकरी भावांची आत्महत्या

36

सामना ऑनलाईन, सातारा

कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सातारा जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांनी याच कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगन्नाथ आणि विजय चव्हाण अशी या भावांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही चांगले शिकलेले होते आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळले होते

कराड तालुक्यातील वडगाव-हवेली येथील हे दोघे रहिवासी होते. या दोघांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी बॅंकाकडून एकूण ६० लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र शेती आणि शेतीपूरक व्यवसायातील तोटयामुळे दोघेही जबरदस्त तणावाखाली होते. त्यातच बँकांनी वसुलीसाठी राक्षसी तगादा सुरू केला होता. यामुळे विजय चव्हाण या ३६ वर्षांच्या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली . ही बातमी त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजेच ४२ वर्षांच्या जगन्नाथ चव्हाण यांना कळाल्यानंतर ते देखील कोलमडले आणि वेगात येणाऱ्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली.

या दोघांनी कडेगांव एमआयडीसीमध्ये सरकीपासून तेल काढण्याचा कारखाना सुरू केला होता. मात्र हा व्यावसाय देखील तोट्यात गेला होता. या घटनेमुळे फक्त चव्हाण कुटुंबच नाही तर संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. या  शेतकरी बंधूंना त्रास देणाऱ्या बँकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या