‘या’ तरुणाने वधूसंशोधनासाठी मागितली पोलिसांची मदत

46

सामना ऑनलाईन । मेरठ

उत्तर प्रदेशातील कैरानामधील एक तरुण आपले गाऱ्हाणे घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर त्याची तक्रार ऐकून पोलिसही चक्रावून गेले. हे प्रकरण कसे सोडवावे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. दोन फूट तीन इंच उंची असलेला अजीम अन्सारी हा तरुण पोलिस ठाण्यात आला. आपले वय 26 वर्षांचे असून अजून आपल्याला जीवनसाथी मिळालेला नाही. त्यामुळे वधूसंशोधनासाठी पोलिसांनी आपली मदत करावी अशी मागणी त्याने एसडीएम अमित पाल शर्मा यांच्याकडे केली. आपले कुटुंबीय आपल्याला वधूसंशोधनात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी आपली मदत करावी असे त्याने सांगितले. त्याची ही तक्रार ऐकून काय कारवाई करावी अशा प्रश्न पोलिसांना पडला.

पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अजीमने आपल्याला वधूसंशोधनात अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. आपले कटुंबीय आपल्याला मदत करत नसल्याने अडचणी वाढल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने पोलिसांची मदत मागितल्यानंतर कैराना पोलीस ठाण्यातील एक पथक त्याच्या घरी पोहचले. पथकाने याबाबत अजीमच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. अजीमचे वडील आणि काका त्याच्यासाठी वधू शोधत आहेत. मात्र, त्याचे लग्न जुळवण्यास आपण असमर्थ असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. एवढा मोठा असूनही अजीम अजूनही बालीश आहे. त्याची उंची कमी असण्यासोबतच त्याच्या इतरही शारीरिक अडचणी आहेत. त्याच्यासाठी योग्य जोडीदार शोधणे अशक्य असल्याचे त्यांच्या वडिलांनी पोलीस पथकाला सांगितले.

वडिलांनी केलेले दावे अजीमने फेटाळले आहेत. आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम असून लग्नानंतर आपण आपले घर चांगल्याप्रकारे चालवू शकतो, असे त्याने म्हटले आहे. गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना भेटून आपली समस्या सांगितली होती. मात्र, आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. त्यामुळे आता पोलिसांची मदत मागितल्याचे अजीमने सांगितले. येत्या रमजान महिन्यात आपण आपल्या जीवनसाथीसोबत रोजे पाळू असेही त्याने सांगितले. पोलिसांनी कटुंबीयांची समजूत घालून त्यांना वधू संशोधनासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे आपण पुन्हा नव्या जोमाने वधूसंशोधनास सुरुवात केली आहे. माझे कुटुंबीय माझ्यासाठी जीवनसाथी शोधण्यास अयशस्वी झाले तर पोलिसांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपल्याला आता नक्की जीवनसाथी मिळेल, अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या