दोन कोटींच्या खंडणीसाठी सख्ख्या बहिणींचं अपहरण; दोन तरुण, एका तृतीयपंथीयाला अटक

गुजरखेडे येथील दोन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून अज्ञात आरोपींनी त्यांचे अपहरण केले व त्यांना सुखरूप सोडविण्यासाठी मुलीच्या वडिलांना 2 कोटी रुपयांची मागणी केली. अपहरणकर्त्यांनी मुलींना ठार मारण्याची धमकी दिली. कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर अपहरणकर्त्यांना कोपरगाव तालुका पोलीस आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले आणि अवघ्या काही तासांमध्ये मुलींची सुखरूप सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या दोघींपैकी मोठी बहीण 17 वर्षांची तर लहान बहीण 15 वर्षांची आहे. मुलींच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली आणि अवघ्या काही तासांत मुलींचा शोध घेतला. पोलिसांनी राहुल विजय पवार (वय 20, रा. नवसारी गाव, मनमाड) रोहित किशोर लोहिया (वय 21, रा. शंकरनगर, पोहेगाव, ता. कोपरगाव, जि. नगर) आणि तृतीयपंथी पुजा उर्फ दिनेश राजेंद्र सोळसे (रा. पोहेगाव, ता कोपरगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

अटकेनंतर पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, मुख्य संशयित आरोपी राहुल पवार याने रविवारी 8 मार्चला रात्रीच्या सुमारास आमिष दाखवून दोघी बहिणींना पळवून नेले होते. पवार याने दोन्ही बहिणींना दुसरा संशयित आरोपी तृतीयपंथी पुजा उर्फ दिनेश राजेंद्र सोळसे याच्याकडे पोहेगाव येथे नेऊन ठेवले होते. यानंतर राहुल पवारने मुलींच्या वडिलांना फोन करत त्यांच्याकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि मनमाड उपविभागीय अधिकारी समरसिंह साळवे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात केली. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी तात्काळ गुन्ह्याचा तपास सुरु करत मुलींच्या शोधासाठी एक पथक कोपरगाव, शिर्डी येथे रवाना केले. सोमवारी रात्री उशिरा शिर्डी येथेही बसस्थानक परिसरात सापळा रचून आरोपींना शिताफीने अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या