लग्न करीन तर तिच्याशीच…एका मुलीच्या भूमिकेने पोलीस हतबल

49

सामना ऑनलाईन । गाजियाबाद

गाजियाबाद पोलीस ठाण्यास शनिवारी पोलिसांसमोर एक मोठी समस्या उभी राहिली. आपल्या मैत्रिणीशी लग्न करण्याचा प्रस्ताव एका विद्यार्थिनीने कुटुंबीयांसमोर ठेवला. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला समजावले. मात्र, ती निर्णयावर ठाम असल्याने तिने मैत्रिणीसोबत पलायन केले. त्यामुळे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. हे प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावले. पोलिसांनी बेपत्ता मुलींना शोधून काढले. मात्र, त्यांना समजावण्यात अपयश आल्याने याबाबत कोणती भूमिका घ्यावी असा यक्षप्रश्न पोलिसांपुढे उभा ठाकला.

कुटुंबीयांची आणि विद्यार्थिनीची बाजू पोलिसांनी समजून घेतली. त्यानंतर पोलिसांनीही मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला. पोलीस काही तास मुलीला समजावत होते. मात्र, ती तिच्या निर्णयावर ठाम असल्याने यातून मार्ग काढण्यास पोलीसही असमर्थ ठरले. दोन्ही मुली सज्ञान असल्याने याप्रकरणी काहीही करू शकत नसल्याचे पोलिसांनी कुटुंबीयांना सांगितले. दोन्ही विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी त्यांना समजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. या दोघी विद्यार्थिनी 5 जूनपासून बेपत्ता होत्या. कुटुंबीयांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत होते. पोलिसांना त्यांना शोधण्यात शनिवारी यश आले. मात्र, त्या दोघींना समजवण्यात अपयश आल्याने आता पुढे काय करायचे असा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. गाजियाबाद पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात राहणाऱ्या या मुली 12 वीत एकाच वर्गात आहे. आमच्यातील मैत्रीतून आमचे एकमेकांवर प्रेम जडले आहे. आता आम्ही आयुष्यभर एकत्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या