मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरु असतांना सापडले दोन मानवी सांगाडे

30

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

तालुक्यातील चांदेगाव शिवारातील प्राचीन श्री चंद्रेश्वर महादेव मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरु आहे शुक्रवारी १२ च्या सुमारास खोदकाम करणाऱ्या कामगारांना दोन मानवी सांगाडे सापडले. ते सांगाडे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हे मंदिर प्राचीन असल्यामुळे सांगाडे नेमके कुणाचे आहेत या संदर्भात पुरातत्व विभागाचे अधिकारी तपास करीत आहेत.

प्रवरा नदीकाठावर हे महादेवाचे मंदिर आहे. त्या ठिकाणी श्री चंद्र देवाने तपश्चर्या केल्याची आख्यायिका आहे. ५०० वर्षांपूर्वीचे पुरातन लिंबाचे मोठे झाड मंदीराच्या आवारात आहे. १९६८ साली या ठिकाणी महंत नारायणगिरीजी महाराजांना सप्ताह भरवला होता. मंदिराच्या चोहोबाजूने पुरातन दगडी भिंती व झाडे आहेत. जिर्णोध्दारासाठी मंदिराच्या पुढच्या बाजूने खोदकाम सुरु असतांना सांगाडे सापडले. या ठिकाणी तपस्वी साधू अथवा इतर कुणी समाधी घेतली असावी का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

श्रीनिवास मारुती शिंदे, जनार्दन रामनाथ गायकवाड, दादासाहेब चांगदेव उबाळे, संजय भांड, गवजी नाना सिणारे, बाळासाहेब नानासाहेब खर्डे, श्रीकृष्ण तुकाराम नालकर यांनी यासंदर्भात एक बैठक घेऊन पुरातत्व विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या