हिंदुस्थानचे दोन संघ मैदानात उतरणार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याकडून संकेत

आयपीएल या टी-20 स्पर्धेमुळे हिंदुस्थानला फायदा झाला आहे. हिंदुस्थानची बेंच स्ट्रेंथ या स्पर्धेमुळे तयार झाली आहे. याच कारणामुळे बीसीसीआयने एकाच कालावधीत दोन हिंदुस्थानी क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे विराट कोहलीची सेना इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल, तर दुसरीकडे  इंग्लंड दौऱयासाठी निवड न झालेले खेळाडू टी-20 व वन डे मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेला जातील. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

श्रीलंकेत सहा सामने खेळावे लागतील

हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील कसोटी मालिका संपल्यानंतर आयपीएल व टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱया क्रिकेट प्रकारांतील खेळाडूंना त्याआधी पुरेसा सराव मिळावा यासाठी श्रीलंकेत टी-20 व वन डे मालिकेचे जुलै महिन्यात आयोजन करण्यात येणार आहे, असे सौरभ गांगुली यांच्याकडून सांगण्यात आले. हिंदुस्थान-श्रीलंका यांच्यामध्ये तीन टी-20 व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.

जागतिक कसोटी फायनल व इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेले हिंदुस्थानी क्रिकेटपटू

रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व रिद्धीमान साहा (फिटनेसवर अवलंबून). स्टॅण्डबाय प्लेयर्स – अभिमन्यू इस्वरन, प्रसिध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवासवाला.

पुढील स्पर्धांसाठी होणार फायदा

जून-जुलै या महिन्यांमध्ये हिंदुस्थानात पावसाळा सुरू असतो. त्यामुळे खेळाडूंना मैदानात जाऊन सराव करता येत नाही. अशा वेळी आयपीएल व त्यानंतर आयोजित करण्यात येणाऱया टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंना सरावविना मैदानात उतरावे लागू शकते. ही बाब डोळय़ांसमोर ठेवून बीसीसीआयकडून श्रीलंकन दौऱयाचे आयोजन करण्यात येणार आहे. जेणेकरून विराट कोहली, रोहित शर्मासारखे दिग्गज इंग्लंडमध्ये खेळत असले तरी इतर खेळाडूंनाही श्रीलंकेतील मालिकेत खेळता येणार आहे. या सरावाचा फायदा इंग्लंडमधील मालिकेत संधी न मिळालेल्या हिंदुस्थानी खेळाडूंना भविष्यातील स्पर्धांमध्ये होणार आहे.

शिखर, पृथ्वी, सूर्यकुमार, श्रेयस अॅण्ड कंपनीला संधी

इंग्लंडमधील मालिकेत संधी न मिळालेल्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना श्रीलंकेतील मालिकेत टीम इंडियामध्ये संधी देण्यात येईल. यामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, हार्दिक पांडय़ा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, राहुल तेवतीया, चेतन साकरीया, नवदीप सैनी, कृणाल पांडय़ा, इशान किशन, भुवनेश्वरकुमार, देवदत्त पडीक्कल,जयदेव उनाडकट,संजॅ सॅमसन या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच काही स्थानांसाठी खेळाडूंची चाचपणीही यावेळी करता येणार आहे. राहुल तेवतीया, राहुल चहर, युजवेंद्र चहल या लेगस्पिनर्सना यावेळी पडताळता येईल. पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर या मुंबईकरांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या