मुलुंडमध्ये सिलिंडरच्या स्फोटात दोघे जखमी

28

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुलुंड गावठाण येथील भीमाबाई चाळीत गॅसगळती होऊन एकामागोमाग एक अशा तीन गॅस सिलिंडरचे भीषण स्फोट झाल्याने आठ घरे जळाली तर आगीचा धूर नाकातोंडात गेल्याने शेवंता फडके (71) व लक्ष्मी अशोक कुमार (30) या दोन महिलांचा श्वास गुदमरला. त्यांना नजीकच्या वीर सावरकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुलुंड पूर्व येथील नवघर, गावठाण, गल्ली क्रमांक 1, कॅम्पस हॉटेलजवळील भीमाबाई चाळीतील घरात सोमवारी दुपारी ही घटना घडली. त्यानंतर लगेचच घटनास्थळी दाखल अग्निशमन दलाच्या पथकाने या आगीवर चार फायर इंजिन, दोन जंबो वॉटर टँकर, दोन वॉटर टँकर यांच्या सहाय्याने दुपारी 2.30 वाजेपर्यंत नियंत्रण मिळवून आग विझवली. दोन महिला शाळेत मुलांना आणायला गेल्याने बचावल्या.

मलबारहिलमधील ज्ञानेश्वर बंगल्याला आग
मलबार हिल येथील वर्षा बंगल्याच्या शेजारी ज्ञानेश्वर बंगल्याच्या सर्व्हन्ट क्वार्टला रात्री 9.15 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या