जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. कोकरनाग उपविभागातील जंगलात दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान ही घटना घडली. गस्त घालणाऱ्या जवानांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आणि त्यांच्यावर गोळीबार केला.
कोकरनाग परिसरातील घनदाट जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराकडून शनिवारी सदर परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरु करण्यात आली. यावेळी जंगलात लपून बसलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटाशी जवानांची चकमक झाली. या चकमकीत दोन जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या परिसरातील वर्षभरातील ही दुसरी चकमक आहे. सप्टेंबर 2023 मध्ये, कोकरनाग जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले होते. शहीद जवानांमध्ये एक कमांडिंग ऑफिसर, एक मेजर आणि एक पोलीस उपअधीक्षक यांचा समावेश होता.