न्यूयॉर्कमध्ये एका पार्टीत गोळीबार; दोघांचा मृत्यू, 14 जण जखमी

अमेरिकेत सध्या गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. न्यूयॉर्कच्या रोचेस्टरमध्ये शनिवारी एका पार्टीत अचानक गोळीबार झाला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

पोर्टीत गोळीबार झाला, त्यावेळी सुमारे 100 जण उपस्थित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा गोळीबार कोणी आणि कशासाठी केला, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गोळीबाराच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक तरूण आणि एका तरुणीचा समावेश आहे. त्यांचे वय 20 वर्षांच्या आसपास असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

डोनियल प्रूडच्या हत्येनंतर अमेरिकेतील वातावरण तापले आहे. रोचेस्टरमध्ये काही दिवसांपूर्वी निदर्शने करण्यात आली होती. प्रूडच्या हत्येचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणात संबधितांवर कारवाई करण्याची मागणी निदर्शकांनी केली होती. या हत्येचा आणि पार्टीत झालेल्या गोळीबाराचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. अमेरिकेच्या टेरे हौटे शहरात एका कॉलेजच्या पार्टीतही गोळीबाराची घटना घडली होती. त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. गोळीबाराच्या वाढणाऱ्या घटना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या