वारंवार आंदोलन, निवेदन देऊनही राज्यातील दोन लाखांवर अंगणवाडी सेविकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मिंधे सरकारविरोधात आज आझादा मैदानात जोरदार आंदोलन करण्यात आले. महागाई भत्त्याला जोडलेले किमान वेतनाइतके मानधन, ग्रॅच्युईटी, मासिक पेन्शन, आहार व इंधनाच्या दरात वाढ, मदतनीसांची सेविकापदी व सेविकांची पर्यवेक्षिकापदी बढती यांचे अन्यायकारक निकष बदलणे, मिनी अंगणवाडय़ांचे मुख्य अंगणवाडीत रूपांतर, अंगणवाडीच्या भाडय़ात वाढ अशा मागण्या अंगणवाडी सेविकांच्या आहेत. मात्र याकडे सरकारला पाहायला वेळ नसल्याचे अंगणवाडी सेविकांचे म्हणणे आहे.
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी फेब्रुवारी 2023 मध्ये संप केला, परंतु 1500 व 1000 रुपयांची मानधन वाढ वगळता पोकळ आश्वासनांखेरीज काहीच पदरात पडले नाही. आश्वासनांची पूर्तता व भरीव मानधन वाढ या मागण्यांसाठी पुन्हा 4 डिसेंबर 2023 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत प्रदीर्घ संप करावा लागला. आशांइतकी मानधन वाढ, ग्रॅच्युईटी, पेन्शन याची आश्वासने मिळाल्यामुळे वाटाघाटी होऊन संप मागे घेण्यात आला. परंतु मिनी अंगणवाडय़ांचे रूपांतर वगळता अजूनही या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. याचा निषेध करीत आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. या सरकारचे थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सरकारला शेवटचा दणका देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे अंगणवाडी सेविकांकडून सांगण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे जयश्री पाटील आदी उपस्थित होते.
सरकारने कल्याणकारी योजनांचा निधी पळवला
राज्यातील महायुती सरकार अंगणवाडी सेविकांना त्यांचा हक्क द्यायचा सोडून हे सरकार सर्व कल्याणकारी योजनांचा निधी पळवून लाडक्या बहिणींच्या झोळीत घालत आहे आणि त्यासाठीसुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच वेठीला धरत आहे. सरकारची कोणतीही योजना येवो, आपले दैनंदिन कामकाज करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्या योजना यशस्वी करण्यासाठी राबावे लागते. पण साधे किमान वेतनही मिळत नाही. अल्प मानधन, म्हातारपणी वर्षभरसुद्धा न पुरणारा एकरकमी मिळणारा सेवा समाप्ती लाभ यामुळे अंगणवाडी सेविका मेटाकुटीला आल्या आहेत.