‘सदानंदाचा येळकोट’ जयघोषाने खंडोबा गड दुमदुमला; सोमवती अमावास्या यात्रेला जेजुरीत लाखो भाविकांची गर्दी

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या सोमवती अमावास्या यात्रेला सुमारे दोन लाख भाविकांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजता पालखी सोहळ्याने कहा नदीवर जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. यावेळी ‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना त्रास जाणवला नाही.

श्री खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार मानला जातो. श्रावण मासातील सोमवारी सोमवती अमावास्या यात्रा आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पहाटेपासूनच गडावर देवदर्शनासाठी रांगा लागल्या. दुपारी11 वाजता मुख्य इनामदार राजाभाऊ पेशवे, सचिन पेशवे यांनी इशारा केल्यावर पारंपरिक पद्धतीने पालखीला शेडा देण्यात आला. खांदेकरी मानकऱ्यांनी पालखी उचलून खांद्यावर घेतली. वाजतगाजत पालखीने मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातली. नवरात्र महालात पालखी आल्यावर पालखीमध्ये श्री खंडोबा म्हाळसादेवी यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या. देवांची स्वारी कहा नदीकडे स्नानासाठी निघाली. यावेळी गडावर प्रचंड गर्दी होती. भाविकांच्या आनंदाला उधाण आले.

कऱ्हा नदीला यंदा भरपूर पाणी आले आहे. दुपारी चार वाजता धार्मिक वातावरणामध्ये पालखीतील उत्सवमूर्तीना पवित्र कहास्नान घालण्यात आले. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.

विश्वस्त मुख्य मंदिरावर चढल्याने ग्रामस्थांचा संताप

पालखी सोहळ्याच्या वेळी खंडोबा देवस्थानचे एक विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांच्यासह ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधील एक कलाकार व त्याचा सहकारी मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यावर चढल्याने ग्रामस्थ व भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी ‘अनावधानाने मी पालखी सोहळा पाहण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यावर चढलो. मला माहीत नव्हते. पुन्हा अशी चूक होणार नाही,’ असे सांगून खेडेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली.