महापालिकेच्या सभेत एमआयएमच्या नगरसेवकांची गुंडागर्दी

23

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यावरून सभागृहात चर्चा सुरू असताना एमआयएमच्या नगरसेवकांनी गुंडागर्दी करीत प्रचंड गोंधळ घातला. हा गोंधळ सुरू असतानाच नगरसेवक राजदंड पळविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे सुरक्षारक्षकाने अडविण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात नगरसेवकाला धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी अर्वाच्च शिवीगाळ करीत सुरक्षारक्षकाला मारहाण केली. त्यातच खुर्ची भिरकावल्याने महापौरांच्या अंगावर पडली. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौरांनी एमआयएमचे गोंधळ घालणारे नगरसेवक सय्यद मतीन आणि जफर बिल्डर या दोघांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय जाहीर करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

महापौर भगवान घडमोडे यांच्या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली. सर्वसाधारण सभेला अडीच तास उशिराने सुरुवात झाली. सभेला सुरुवात होताच एमआयएमच्या नगरसेवकांनी शहरात समान पाणीवाटप करण्याचा मुद्दा उपस्थित करून त्यावर चर्चा सुरू करण्याची मागणी केली. एमआयएमचे नगरसेवक तावातावाने बोलत असल्याने सभागृहात गोंधळ सुरू झाला. महापौरांना प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाणार असल्याचे सांगितल्यानंतर नगरसेवक विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठय़ावर बोलण्याचा प्रयत्न करीत असताना एमआयएमच्या नगरसेवकांनी गुंडागर्दी करीत जोरजोरात बोलून अडथळा आणला. समान पाणीवाटप करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करीत महापौरांच्या आसनासमोर येऊन गोंधळ घालत राजदंड पळविण्याचा प्रयत्न करू लागले. सुरक्षारक्षकांनी राजदंड धरून ठेवला या गोंधळात नगरसेवक अजीम याने राजंदड पळविताना सुरक्षारक्षक बाबू सोनू जाधव यास धक्काबुक्की केली.

सुरक्षारक्षक राजदंड धरण्यासाठी आला असता नगरसेवकाला धक्काबुक्की केल्याची बतावणी करीत एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन, जफर बिल्डर यांनी सभागृहात अर्वाच्च शिवीगाळ करीत सुरक्षारक्षकाच्या अंगावर धावत जाऊन त्यास मारहाण सुरू केली. या गोंधळातच महापौरांनी १० मिनिटे सभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. महापौर आसनावरून उठून जाऊ लागले. परंतु संतप्त झालेल्या एमआयएमचे नगरसेवक खुर्च्या भिरकावू लागले. खुर्ची जोरात फेकल्याने महापौरांना ती लागली. खुर्ची लागल्यामुळे महापौर जाम भडकले. सभा सुरू करीत असल्याचे जाहीर करून एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन, जफर बिल्डर, अजीम अहमद या तिघांचे नगरसेवक पद कायमस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचे सभागृहात जाहीर करून या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. एवढ्यावरच न थांबता पोलिसांना तातडीने पाचारण करण्याचे आदेश देऊन १० मिनिटे सभा तहकूब केली. सभा तहकूब केल्यानंतरही सय्यद मतीन, जफर बिल्डर यांनी राजदंड पळविला. सभागृहात राजदंड घेऊन फिरत असताना सुरक्षारक्षकांनी त्यांच्या हातातून राजदंड हिसकावला.

अजीम अहमदचे सदस्यत्व कायम ठेवले

सभेला पुन्हा सुरुवात होताच शिवसेनेचे नगरसेवक संतप्त झाले. या नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढा, प्रशासनाला आदेश द्या, अशी मागणी केली. महापौर भगवान घडमोडे यांनी अजीम अहमद यांचे सदस्यत्व कायम ठेवण्यात येत असल्याचे जाहीर करीत एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन व जफर बिल्डर यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. हे दोन्ही सदस्य सभागृहात महापौरांना गयावया करू लागले. एक दिवसाचे निलंबन करा, कायम सदस्यत्व रद्द करू नका, अशी विनवणी करीत असताना पोलिसांनी या नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर सभेला पुन्हा सुरुवात झाली.

वंदे मातरम् म्हणण्यास विरोध करणारे हेच नगरसेवक

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् म्हणण्यास विरोध करणारे सय्यद मतीन आणि जफर बिल्डर या दोन एमआयएमच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतरही आज झालेल्या सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या या दोन नगरसेवकांनी सभागृहात अर्वाच्च शिविगाळ करीत सुरक्षारक्षकाला मारहाण करून पुन्हा गुंडागर्दी केली. या नगरसेवकांवर गुन्हा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान एमआयएमच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे कळताच एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील मनपा कार्यालयात धावत आले. महापौर भगवान घडमोडे यांची भेट घेवून त्यांच्याकडे नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या