नक्षलवाद्यांनी पेरलेला प्रेशर बॉम्ब फुटला, दोन अधिकारी जखमी

23
फाईल फोटो: पीटीआय

सामना प्रतिनिधी । नागपूर

नक्षलवाद्यांनी लावलेला बॅनर काढत असताना प्रेशर बॉम्बचा स्फोट झाल्याने दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. कोरची तालुका मुख्यालयापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावरील पकनाभट्टी येथे घडलेल्या या घटनेत साहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तवाडे व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश चावर हे दोन अधिकारी जखमी झाले. दरम्यान, उपचाराकरता दोघांनाही नागपूरला हलवण्यात आले आहे.

कोरची ते पकनाभट्टी हे अंतर जवळपास १ किलोमीटर आहे. नक्षलवाद्यांनी या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्या पुलाजवळच्या झाडाला एक बॅनर बांधला होता. या बॅनरवर मनुवादाविरोधात मजकूर लिहिला असून, क्रांतीकारी आदिवासी महिला संघटन, दंडकारण्य असा उल्लेख खाली करण्यात आला आहे. बॅनर लावल्याची माहिती मिळताच कोरचीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तवाडे व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश चावर हे पहाटे पाचच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. तो बॅनर काढत असताना अचानक प्रेशर बॉम्बचा स्फोट झाला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले.

तवाडे आणि चावर हे नि:शस्त्र होते तसेच त्यांच्यासोबत अन्य पोलीस सहकारी नव्हते, अशी माहिती मिळते. बॅनर काढताना योग्य काळजी न घेतल्याने त्यांच्यावर हे संकट ओढवले असल्याची चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या