चार वर्षांपासून एकाच पदावर दोन शिक्षक…नाव, शिक्षण, वयात समानता…वाचा सविस्तर…

teacher-1
प्रातिनिधिक

वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे आणि गुन्हेगारीमुळे बिहार नेहमी चर्चेत असते. आता बिहारमध्ये शिक्षक भरती आणि बोगस शिक्षकाचा नवा घोटाळा उघड झाला आहे. शेखपुरा जिल्ह्यात चार वर्षांपासून एकाच पदावर दोन शिक्षक कार्यरत होते. एकाच पदावर आणि एकाच सर्टिफिकेटवर ते नोकरी करत होते. तसेच चार वर्षांपासून बोगस शिक्षकाला नियमित पगारही मिळत होता. नियुक्ती झालेल्या शिक्षकाचे नाव, वय, शिक्षण आणि इतर सर्व माहितीची नक्कल करत बोगस शिक्षकानेही तशीच माहिती भरली होती. त्यामुळे हा घोटाळा चार वर्षात उघडकीस आला नव्हता.

राकेश कुमार या शिक्षकाची माहिती बोगस शिक्षकाने मिळवली होती. तसेच या नावाची सर्व बनावट कागदपत्रे बनवून तो नोकरी करत होता. चार वर्षांपासून या बोगस शिक्षकाला पगारही मिळत होता. एवढी बनावट कागदपत्रे आणि नियुक्ती झालेल्या शिक्षकाची माहिती बोगस शिक्षकाला मिळाल्यामुळे या घोटाळ्यात शिक्षण विभागाचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, शिक्षण विभागाने या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत शिक्षण विभागाकडून करण्यात येत असलेल्या ईपीएफ नोंदणीमुळेच ही घटना उघडकीस आल्याचे म्हटले आहे.

शिक्षण विभागाकडून ईपीएफ खाते नोंदणीवेळी ही बाब उघडकीस आली. बोगस शिक्षकाने स्वतःचे ईपीएफ खाते आधीच सुरू केले होते. त्यामुळे नियुक्ती झालेले शिक्षक राकेशकुमार खात्याच्या नोंदणीसाठी आल्यावर तुमचे खाते सुरू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, आपण खाते सुरू केले नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केल्यावर एकाच पदावर, एकाच नावाचे दोन शिक्षक कार्यरत असल्याचे दिसून आले. दोघांचेही नाव, वय, वडिलांचे नाव, शिक्षण सर्व बाबी समान होत्या. त्यामुळे अधिकारीही चक्रावले. याची सखोल माहिती घेतली असता बोगस शिक्षकाची माहिती उघड झाली. याबाबत चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभाकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या