शेतजमिनीतील लिंबाचे झाड तोडण्यावरून वाद; दोन गटांत हाणामारी

347

गंगाखेड तालुक्यातील पडेगाव शिवारामध्ये शेतजमिनीतील लिंबाचे झाड तोडण्यावरून झालेल्या वादाचे रुपांतर दोन गटांच्या हाणामारीत झाले. या हाणामारीत दोन जणांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने वार करण्यात आले. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड तालुक्यातील पडेगाव शिवारामध्ये अशोक भागोजी बोबडे व उत्तम दतराव आगलावे यांच्यामध्ये शेतजमिनीचा वाद सुरू आहे. सर्वे नंबर 111 मध्ये पाणंद रस्त्याचे काम चालू असताना अशोक बोबडे बुधवारी दुपारी 11.30 वाजता शेतामध्ये पाणंद रस्ता तयार करण्यासाठी जमीन मोजणी करत असताना त्या वादग्रस्त जमिनीमध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाच्या तोडण्यावरून उत्तम आगलावे यांनी हातातील कुऱ्हाड बोबडे यांचे चुलते खोबराजी तुकाराम बोबडे यांच्या डोक्यामध्ये मारून त्यांना गंभीर जखमी केले. अशोक बोबडे यांचे बंधू ज्ञानोबा भागोजी बोबडे सोडविण्यासाठी गेले असता त्यांना उत्तम आगलावे यांच्यासह अन्य तिघांनी त्यांच्याही डोक्यात कुऱ्हाड मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाणे येथे अशोक भागोजी बोबडे (रा. पडेगाव ) यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी उत्तम दतराव आगलावे, जोतिराम एकनाथ आगलावे, आकाश गोपीनाथ आगलावे, बळीराम एकनाथ आगलावे (सर्व रा. पडेगाव) यांच्या विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश राठोड करीत आहेत .

आपली प्रतिक्रिया द्या