दोन्ही जलवाहिन्यांच्या गळतींची दुरुस्ती पूर्ण, आजही निर्जळी

17

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी आणि फारोळा येथील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. रात्री ७ वाजेपासून पंप सुरू करण्यात आल्यामुळे रविवारी जलकुंभातून ज्या भागाला शनिवारी पाणी मिळाले नाही, त्या भागाला रविवारी पाणी दिले जाणार आहे.

शहराला १०० एमएलडीचा पाणीपुरवठा करणाऱ्या १२१९ मि.मी. व्यासाच्या वाहिनीची जायकवाडी धरणातील पंपहाऊसजवळ वेल्डिंग निखळून मोठी गळती लागली होती. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू ठेवल्यास किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यास ही वाहिनी फुटून मुख्य व सब अशा दोन्ही स्टेशनचे नुकसान होण्याचा धोका होता. दुसरीकडे ५६ एमएलडी पाणीपुरवठ्याच्या जुन्या ७०० मि.मी. व्यासाच्या वाहिनीचीही रबर पॅकिंग फाटली. त्यामुळे या दोन्ही योजनांच्या दुरुस्तीसाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने आज शनिवारी सकाळी ९ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत शटडाऊन घेत दोन्ही जलवााहिन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात सकाळी सात वाजेपासूनच पाणीपुरवठा बंद करीत

पाणीपुरवठा विभागाच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतर वाहिनीला केलेली वेल्डिंग थंड होऊ देण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी घेण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी सांगितले.

शटडाऊन काळात शनिवारी दिवसभर शहरात पाण्याचा थेंबही आला नाही. रात्री दहा वाजेनंतर पंपहाऊसमधून दोन्हीही जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. रविवारी एक ते दीड वाजेच्या सुमारास शहरातील जलकुंभांत पाणी येईल. सर्व जलकुंभ भरण्यासाठी ८ ते १० तासाचा अवधी लागू शकतो. कारण जलवाहिन्यांवर बायपासद्वारे पाणी वळविण्यात आले आहे. शटडाऊनमुळे पाणीपुरवठा विभागाने शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले आहे. उद्या रविवारी पाणीपुरवठा केला जाणार आहे.

सिडकोच्या काही भागांत पाणीपुरवठा
शुक्रवारी दिवसभरात जलकुंभात पाण्याचा साठा तयार झाला होता. यामुळे शनिवारी सकाळी शटडाऊन घेतल्यानंतरही जलकुंभातील उपलब्ध साठ्यातून सिडकोतील ज्या वसाहतींचा पाणीपुरठ्याचा दिवस होता, त्यांना पाणी देण्यात आले. सिडकोच्या काही भागांत शुक्रवारी पाणी देण्यात आले नव्हते, त्या वसाहतींना शनिवारी पाणीपुरवठा केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या भागात रविवारी व सोमवारी पाणीपुरवठा होणार आहे, त्या भागांना अनुक्रमे सोमवारी व मंगळवारी पाणीपुरवठा होईल.

आपली प्रतिक्रिया द्या