मुंबईत दोन विमाने एकाच धावपट्टीवर, सुदैवाने भीषण अपघात टळला

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकाच धावपट्टीवर आल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. एक विमान धावपट्टीवर लॅण्ड होतानाच दुसऱया विमानाने त्याचवेळी उड्डाण घेतले. या टेकऑफ आणि लॅण्डिंगमध्ये काही सेकंदांचे अंतर होते. जर ही वेळ चुकली असती तर दोन विमानांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला असता. शेकडो विमान प्रवाशांच्या आणि केबीन क्रू मेंबर्सच्या अक्षरशः चिंधडय़ा उडाल्या असत्या. मात्र सुदैवाने हा अपघात टळला.

या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून डीजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱयाला निलंबित करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावरून येणारे इंडिगोचे 5053 हे विमान धावपट्टी 27 वर उतरत होते, तर एअर इंडियाचे विमान 657 तिरुवनंतपुरमसाङ्गी टेकऑफ करण्याच्या तयारीत होते. लॅण्डिंग आणि टेकऑफ एकाच वेळी झाले. यावेळी वेळच चुकली असती आणि दोन्ही विमाने एकाच धावपट्टीवर असती तर भीषण अपघात होण्याची शक्यता होती, असे एटीसी गिल्ड इंडियाचे सरचिटणीस आलोक यादव यांनी सांगितले.

नेमके काय चुकले?

मुंबई आणि दिल्ली विमानतळे ही सर्वात व्यस्त विमानतळे आहेत. या दोन्ही विमानतळांवर दर तासाला सुमारे 46 उड्डाणे होतात, तर दिवसाला हजारांहून अधिक उड्डाणे होतात. विमान आणि प्रवाशांची सुरक्षा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची जबाबदारी आहे. विमानांच्या टेकऑफ आणि लॅण्डिंगच्या वेळी दृश्यमानताही चांगली होती. त्यामुळे नेमके कुङ्गे चुकले आणि काय चुकले याबाबतची चौकशी सुरू आहे, असे आलोक यादव यांनी सांगितले.