आसाममध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला; झाडाला बांधून केली मारहाण

654

आसाममध्ये नगाव जिल्ह्यात दोन पोलिसांवर हल्ला करून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी हे पोलीस या गावात गेले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. घटनेनंतर अतिरिक्त पोलिसांची कुमक आली आणि या पोलिसांची जमावाच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गैरवर्तन केल्याने त्यांना काहीजणांनी मारहाण केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

या गावातील रहिवासी हिरक ज्योतीनाथ याने आपला शारीरिक आणि मानसीक छळ केल्याचा आरोप करत त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. त्याबाबत हिरक आणि त्याच्या कटुंबीयांची चौकशी करण्यासाठी हे पोलीस गावात आले होते. पोलीस चौकशीसाठी आल्याचे समजल्यावर हिरक आणि त्याच्या कटुंबीयांनी पोलिसांवर हल्ला चढवला. त्यांनी काही गावकऱ्यांनीही मदत केली. त्यानंतर दोन पोलिसांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. जमावाने पोलिसांचे केसही कापले. घटनेची माहिती मिळाल्यावर तातडीने पोलिसांचे पथक आले आणि या दोन पोलिसांची जमावाच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गावात आलेल्या पोलिसांनी मद्यपान केले होते. तसेच हिरकच्या कटुंबातील महिलांशी त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप काही गावकऱ्यांनी केला आहे. महिलांशी छेडछाड करत असल्याने त्यांना रोखण्यात आले. त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांना मारण्यास सुरुवात केली. त्यामुळ संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणाऱ्या काहीजणांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या