जावयांची सासरवाडीला कोरोनाची भेट, भीतीने मांडणी गावातील 15 कुटुंबांनी शेतात केले स्थलांतर

1606

अहमदपूर तालुक्यातील मांडणी गावात मुंबई येथुन आलेले दोन जावई कोरोना घेऊन आले आणि सासुरवाडीतील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता गावातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार झाली आहे. प्रशासनाने गाव सिलबंद केले आहे. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून 15 कुटुंबांनी शेतात मुक्काम हलविला आहे.

या बाबतची सविस्तर माहिती अशी की, मांडणी ता.अहमदपूर येथे मुंबईहून 14 मे रोजी दोन जावायांचा गावात प्रवेश झाला. त्यांचे मुळ गांव अहमदपुर तालुक्यातील सुनेगांव सांगवी आहे परंतु ते आपल्या गावी न जाता सासुरवाडी आले. ते मुंबईहून येत असताना त्यांच्या सोबत नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील नागरिक होते. त्यांच्याशी जावयांचा संपर्क आला होता.बिलोली ला जाणारे नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानतंर त्यांना विचारले असता तुमचा कुणा कुणाशी संपर्क आला आहे तेव्हा त्यांनी मांडणी येथील दोन्ही जावयांची नावे सांगितली. बिलोली येथील तालुका आरोग्य अधिकारी यांनी अहमदपुर तालुका आरोग्य यांना माहिती दिली. २१मे रोजी संध्याकाळी दोन जावायांसहित सहा जणांना मरशिवणी येथे क्वांरनटाईन करण्यात येऊन २२तारखेला संध्याकाळी त्यांचे स्वॉबचे नमुने घेतले. २४मे रोजी आलेल्या अहवालात दोन्ही जावई कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे पुढील उपचारासाठी मरशिवणी ता.अहमदपुर येथे ठेवण्यात आले. उरलेल्या चौघांचा अहवाल २६ला संध्याकाळी आला त्यात दोघे कोरोना पॉझिटिव्ह तर दोघे निगेटिव्ह आले. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन जावयांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहा जणांना २५मे रोजी ताब्यात घेतले असून त्यांना मरशिवणी येथील विलिनीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल अजून येणे बाकी आहे. परंतु गावात चौघेजण कोरानाग्रस्त असल्याने गावात सन्नाटा पसरला असून भीतीचे वातावरण आहे. ज्यांच्याकडे शेती आहे आणि राहण्याची व्यवस्था आहे अशा जवळपास १५ कुटुंबांनी मुक्काम शेतात हलविला आहे. ज्यांना पर्याय नाही असे कुटुंब भितीने दिवस काढत आहेत.

मांडणी गावात चार रुग्ण आढळून आल्याने प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषीत करण्यात आले असून येथून पुढील १४ दिवस आरोग्य पथक दररोज सर्व्हे करणार असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल दासरे यांनी दिली. प्रतिबंधित क्षेत्र मांडणी गावास अहमदपूरचे तहसिलदार महेश सावंत,गटविकास अधिकारी ढवळशंक, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सुनिल दासरे,उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.आश्विनी पाटील,पोलीस निरिक्षक सुनिल पुजारी शिरुर ताजबंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ.राहूल सारोळे, डॉ.मारोती पाटील यांनी भेट देवून पुढील १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केले.

आपली प्रतिक्रिया द्या