पादचारी तरुणीचा मोबाईल हिसकावला, दोघा चोरांना तासाभरात पकडले

व्हिडीओ बघत रस्त्याने चालत जाणाऱ्या तरुणीच्या हातातला मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघा चोरांना पार्क साईट पोलिसांनी तासाभरात पकडले. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.

पारुल मिश्रा (21) ही तरुणी कांजुरमार्ग स्थानकात उतरल्यानंतर ती पायी भांडुपच्या दिशेने निघाली होती. मोबाईल बघत ती जात असताना समोरून आलेल्या दोघांनी शिवीगाळ करत तिच्या हातातला मोबाईल हिसकावून पळ काढला. पारुलने आरडाओरड केल्याने एक चोरटा घटनास्थळीच पकडला गेला, तर दुसरा मोबाईल घेऊन सटकला. हा प्रकार कळताच वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मोहन जगदाळे, उपनिरीक्षक हिरे तसेच सुतार, नवले, गायकवाड, गोसावी यांनी दुसऱया आरोपीचा शोध सुरू केला. तासाभरात त्याला शोधून पारुलचा मोबाईल परत मिळवला. शाबाज अन्सारी, कादर कुरेशी अशी आरोपींची नावे असून दोघांनाही बेडय़ा ठोकण्यात आल्या.