दोन वर्षात दोन हजार मुस्लिमांना नागरिकत्व दिले – अर्थमंत्री सीतारमण

379
nirmala-sitharam-pti

गेल्या दोन वर्षात दोन हजार मुस्लिमांना हिंदुस्थानी नागरिकत्व दिले अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले आहे. तसेच जे लोक नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात सरकारवर भेदभावचा आरोप करत आहेत ते चुकीचे आहे असेही सीतारमण म्हणाल्या. तमिळनाडूच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “2016-2018 या काळात 2 हजार मुस्लिमांना हिंदुस्थानी नागरिकत्व देण्यात आले. त्यात पाकिस्तानी गायक अदनान सामी आणि बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचाही समावेश आहे.” ज्या दोन हजार मुस्लिमांना हिंदुस्थानी नागरिकत्व देण्यात आले त्यापैकी 391 अफगाणिस्तानचे नागरिक होते तर पाकिस्तानचे 1595 नागर होते असेही सीतारमण म्हणाल्या.

सीतारमण यांनी शरणार्थींना दिलेल्या नागरिकत्वाची आकडेवारी दिली. गेल्या 6 वर्षात हजारो लोकांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यात आले. त्यात पाकिस्तानचे 2838, अफगाणिस्तानचे 914, बांग्लादेशचे 172 नागरिकांचा समावेश अहे. तसेच त्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाच्या लोकांचा समावेश आहे. हिंदुस्थानने 1964 ते 2008 दरम्यान श्रीलंकेहून आलेल्या 4 लाख तमिळ शरणार्थींनाही नागरिकत्व दिल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांचे आयुष्य अधिक चांगले व्हावे हा नवी कायद्याचा हेतू आहे असे सीतारमण म्हणाल्या. तसेच कुणाचेही नागरिकत्व काढण्यासाठी नव्हे तर नागरिकत्व बहाल करण्यासाठी हा कायदा आणल्याचे त्यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या