पुणे शहरात दोन वेळा पाणीपुरवठ्याचा आज निर्णय होणार

16

कालवा समितीची आज मुंंबईत बैठक

पुणे – शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात कालवा समितीची बैठक मुंबईत होत आहे. त्यात आगामी महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. तरीही शहराला एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला सध्या रोज १२५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. दोन वेळा पाणीपुरवठा करण्यासाठी १३०० एमलडी पाण्याची गरज आहे. मात्र, गेले काही महिने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ती फेटाळून लावली आहे. आता निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.

आंदोलनाला घाबरून बैठक मुंबईत
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसताना पुणेकरांनी दिवसाआड पाणी घेऊन सहकार्य केले. मात्र, धरणांत पुरेसा पाणीसाठा असताना दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली. शहराचा पाणीपुरवठा अचानक बंद करणारे पाटबंधारे विभागाचे अधिकारी पी. बी. शेलार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात काँग्रेस आंदोलन करणार होती. त्याची कुणकुण भाजपला लागली. त्यामुळे या आंदोलनाला घाबरून कालवा समितीची बैठक मुंबईत होणार असल्याची टीका काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली.

मुंढवा जॅकवेलमधून २४ दिवस
एकही थेंब पाणी उचलले नाही
– गेल्या ४० दिवसांत मुंढवा जॅकवेलमधून एकही थेंब पाणी उचलले नसल्याचे उघडकीस आले आहे. शेतीसाठी २५०० एमएलडी पाणी ४० दिवस रोज सोडले आहे. प्रक्रिया केलेले पाणी असतानाही फ्रेश पाणी सोडण्याची जी कर्तबगारी दाखविली, त्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन, असे उपरोधिक निवेदन सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि विश्‍वास सहस्रबुद्धे यांनी खडकवासलाचे अधिकारी पी. बी. शेलार यांना दिले आहे.

पालकमंत्र्यांकडे पक्षासाठीच वेळ
– कालवा समितीची बैठक पुण्यात होणे अपेक्षित होते. मात्र, ती मुंबईत ठेवली आहे. त्यामुळे सर्व आमदार आणि अधिकार्‍यांना मुंबईला जावे लागणार आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सोडून पालकमंत्री पुणे जिल्ह्यात प्रचारासाठी ठाण मांडून होते. मात्र, शहरासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका विवेक वेलणकर यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या