परळ टीटी उड्डाणपुलावर 1 जूनपासून दुचाकी, अवजड वाहनांना प्रवेशबंदी

पूर्व उपनगर आणि मुंबई शहराला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा परळ टीटी उड्डाणपूल 1 जूनपासून दुरुस्तीच्या कामामुळे दुचाकी आणि अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे (एक्स्पांशन जॉइंट) भरण्यासह रस्त्यावर असणारे खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पूल मजबूत होईपर्यंत या उड्डाणपुलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना येत्या 1 जूनपासून बंदी घालण्यात येणार आहे.

परळ टीटी उड्डाणपुलावर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची सुरुवात झाली आहे. या ठिकाणी अवजड वाहनांमुळे दरवर्षी पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणत खड्डे पडण्याचा अनुभव येतो. म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी या उड्डाणपुलावर अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, अशी विनंती पालिकेच्या पूल विभागाला केली होती. अवजड वाहनांना मज्जाव करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र मुंबई वाहतूक पोलिसांकडून मिळाले आहे. त्यामुळेच परळ टीटी उड्डाणपुलाच्या आधी आठवडाभराच्या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करणारा हाईट बॅरियर लावला जाणार आहे.

सध्या फक्त रात्रीच्या वेळेत या पुलावर दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येत आहे. रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेतच वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार या ठिकाणी खड्डे भरणे आणि सांधे भरण्याचे काम सुरू आहे. हे काम 31 मेपर्यंत पूर्ण होणार आहे.

लोअर परळच्या पर्यायानंतर पुलाचे काम

पालिकेच्या डिलाईल रोड (लोअर परळ) उड्डाणपुलाचे काम सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लोअर परळच्या उड्डाणपुलाचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर परळ टीटी उड्डाणपुलाचे काम येत्या ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येणार आहे. या ठिकाणी पुलाच्या सक्षमीकरणाच्या कामासाठीचे कार्यादेश पूल विभागाकडून देण्यात आले आहेत. साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी या कामासाठी अपेक्षित आहे. विद्यमान उड्डाणपुलाच्या पायाचा आधार घेऊनच नव्या उड्डाणपुलाचा सॉलिड रॅम्प स्थिर करण्यात येणार आहे.

 31 मेपर्यंत बॅरियेट लावणार

सद्यस्थितीत पुलाच्या प्रसरण सांध्याचा भाग वाहतुकीसाठी योग्य नाही. त्यामुळे पूल मजबूत होत नाही तोपर्यंत दुचाकीसाठी खुला करण्यात येणार नाही. या उड्डाणपुलासाठी हाईट बॅरियेट लावण्यासाठी विभागीय पातळीवर काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार 31 मेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे पूल विभागाकडून सांगण्यात आले.

वाहनचालकांची गैरसोय होऊ नये तसेच उड्डाणपुलाचा पर्याय किमान खर्च आणि वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून ऑक्टोबरमध्ये ब्रीजच्या मजबुतीचे काम उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार आहे. तर 31 मेपर्यंत उड्डाणपुलाची सर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण होणार असल्याचे पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय काQडण्यपुरे यांनी सांगितले.