‘त्या’ पैलवानांच्या हत्येचा छडा लागला

41

सामना ऑनलाईन । सातारा

साताऱ्यातील फलटणमध्ये शनिवारी (१० जून) झालेल्या दोन पैलवानांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेमप्रकरणातून या हत्या झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. हत्येप्रकरणी मुलीचे वडील विलास भिसे यांना अटक करण्यात आली आहे तर मुलीचा भाऊ पोलीस उपनिरीक्षक विजय भिसे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपासात पोलीस उपनिरीक्षक विजय भिसेचा हत्येत सहभाग आढळल्यास त्याच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

शनिवारी पैलवान विजय यशवंत सुळ (३२) आणि पैलवान सुनिल जालिंदर सोनवलकर (३०) यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर दोघांचे मृतदेह जवळील शेतात टाकण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय सुळ आणि मुलीचं काही वर्षापासून प्रेमप्रकरण होतं. सुळ आधीपासूनच विवाहीत असल्यानं या प्रेमप्रकरणाला मुलीच्या वडिलांचा आणि भावाचा विरोध होता. मात्र मुलीच्या घरच्यांनी समाजावूनही सुळ हे नातं संपवण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे अखेर आरोपींनी विजय सुळला संपवण्याचा निर्णय घेतला.

शुक्रवारी रात्री पैलवान सुळ आणि त्याचा मित्र सोनवलकर एका लग्न समारंभावरून रात्री परतत असताना आरोपींनी आपल्या घराजवळ दोघांना अडवलं. प्रथम त्यांनी दोघांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि त्यानंतर धारधार शस्त्रानं वार करत प्रथम सुळ याला जागेवरच ठार केलं. तेथून पळणाऱ्या सोनवलकरचा पाठलाग करत त्याचीही हत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या