रेती टिप्परने दिलेल्या धडकेत दोन तरुणी जागीच ठार

सामना प्रतिनिधी । नागपूर

आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी नागपुरच्या पारडी येथे 2 मुलींना टिप्परने चिरडले. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही मुलींचा घटनास्थळीच मृत्यु झाला.

लक्ष्मी शाहु वय 21 आणि आँचल शाहु वय 19 राहणार, अम्बे नगर, दुर्गा नगर या सकाळी दूध आणण्यासाठी जात असतांना समोरून एक टिपर आला. रस्ता लहान असल्यामुळे त्या टिप्परच्या चाकात अडकल्या आणि जागीच त्यांचा करुण अंत झाला. घटनास्थळी मेट्रो आणि उड्डानपुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असून त्यामुळे रोज येथे लहान मोठे अपघात होत आहेत. गेल्या 48 तासात भंडारा रोडवर अपघाताचे 3 बळी गेले आहेत. यामुळे परिसरात रोष व्यक्त केला जात आहे.