टी-२० मालिकेसाठी टाय ‘इन’, कमिन्स ‘आऊट’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या पाच एकदिवसीय मालिकेत पाहुण्या संघाचा पहिल्या तीन सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे टी-२० मालिकेसाठी संघामध्ये बदल अपेक्षीत होते. टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज कमिन्सला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज टायची निवड करण्यात आली आहे.

कमिन्सने हिंदुस्थानविरुद्ध झालेल्या पहिल्या तिन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र अशेन्स मालिकेपूर्वी त्याला आराम मिळावा यासाठी टी-२०मध्ये त्याची निवड करण्यात आली नाही, असे ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले आहे. कमिन्सच्या जागी निवड करण्यात आलेल्या टायला हिंदुस्थानमध्ये आयपीएल खेळण्याचा अनुभव आहे. टायसोबत नॅथन कुल्टर-नाईल, केन रिचर्डसन आणि जेसन बेहरेनड्रॉफ ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजीची धूरा सांभाळतील. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला ७ ऑस्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

आयपीएलमध्ये टायने गुजरात लायन्स संघाकडून खेळताना हॅट्रिक घेतली होती. गुजरातकडून त्याने ६ सामन्यात १२ बळी घेतले होते. मात्र खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला इतर सामन्यांना मुकावे लागले होते.

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका

पहिला सामना – ७ ऑक्टोबर (रांची)
दुसरा सामना – १० ऑक्टोबर (गुवाहाटी)
तिसरा सामना – १३ ऑक्टोबर (हैद्राबाद)