टंकलेखनाचा ‘खडखडाट’

40

>>शशिकांत कोल्हटकर<<

मध्यंतरी वर्तमानपत्रात टंकलेखनाचा ‘खडखडाट’ बंद अशी बातमी वाचली. एका प्रसिद्ध कंपनीत मी पूर्ण तीस वर्षे टंकलेखक (टायपिस्ट) म्हणून एका मॅन्युअल टायपिंगची नोकरी केली. दीर्घकाळ सेवा केल्यामुळे ‘खडखडाट’ करणारे यंत्र किती उपयुक्त आहे याचे महत्त्व मला पूर्ण पटले आहे. कोणताही चांगला कागद मशीनमध्ये सरकवून टाईप करता येतो. कार्बन पेपरच्या सहाय्याने एकाच वेळी अनेक प्रती काढता येतात. एखादा चुकीचा शब्द ‘रबरा’ने खोडता येतो. टाईप करीत असताना अचानक वीज गेली तरी काम चालूच राहते. नैसर्गिक प्रकाशातसुद्धा टाईप करता येते. चष्मा लावून कागदाकडे पाहिल्यावर त्रास होत नाही. आता कॉम्प्युटर (संगणक)च्या सहाय्याने टाईप करायचे म्हणजे वीजही अत्यावश्यकच असते. मध्येच वीज गायब झाली तर केलेले काम पुसले जाण्याची शक्यता. शिवाय सतत पडद्यावर नजर ठेवावी लागल्यामुळे नजर बिघडू शकते. अनेक प्रती काढायच्या असतील तर त्याला स्वतंत्र प्रिंटर जोडावा लागतो. एकूण संगणकाचा खर्चही न परवडणारा असतो. टाईपरायटर स्वतंत्र विकत घेता येते आणि सहज कामासाठी नेता येते. जुने ते सोने या उक्तीप्रमाणे दुर्लक्षित केलेले मॅन्युअल टायपिंग आणि टाईपरायटर याचाच भविष्यकाळात आधार घ्यावा लागणार आहे. तेव्हा टाईप रायटरला कमी समजू नये. ऑगस्टनंतर बंद न करता पुढे वेळेला उपयोगी पडेल हे लक्षात घेऊन त्याचाही स्वीकार व्हावा. आजचे आधुनिक संगणक तंत्रज्ञान उद्या राहणार नाही. त्यात नवीन सुधारणेची भर पडेल. त्यामुळे कालचे तंत्रज्ञान हे शाश्वत स्वरूपाचे राहात नाही आणि ते भंगारात जमा होते. जुन्याची सरकार मान्यता काढून घ्यावी, पण त्याबरोबरच मॅन्युअल टायपिंग व्यवसाय म्हणून प्रोत्साहन द्यावे.

आपली प्रतिक्रिया द्या