लग्नानंतर वर्षभरात एकदाही भांडण नाही, कंटाळलेल्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

4298
divorce

पत्नीने पाणी दिले नाही, बुरखा निट घातला नाही, पती त्रास देतो, बाहेर लफडी सुरू आहेत, अशी अनेक कारणं आपण घटस्फोटाची पाहिली आहेत. बऱ्याचदा पती किंवा पत्नीकडून प्रेम मिळत नाही म्हणूनही घटस्फोट घेतल्याची उदाहरणं दिसतील. परंतु यूएईमध्ये मात्र एक अजबच प्रकरण उघडकीस आले आहे. येथे पती खूपच प्रेम करतो आणि भांडत नाही म्हणून कंटाळलेल्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

यूएईच्या फुजैरा येथील शरिया कोर्टात महिलेने तलाकसाठी अर्ज दाखल केला आहे. लग्नाला एक वर्ष झालेल्या पत्नीने पतीच्या अति प्रेमामुळे आपण कंटाळलो असल्याचे म्हटले आहे. तसेच पत्नीने पती माझ्यावर कधीही ओरडत नाही, माझ्याशी भांडत देखील नाही आणि मला उदासही होऊ देत नाही, असे आपल्या अर्जात म्हटले आहे.याबाबत ‘खलीज टाइम्स’ने वृत्त दिले आहे.

‘मी एवढ्या जास्त प्रेमामुळे आणि स्नेहामुळे त्रस्त झाली आहे. पती भांडत तर नाहीच शिवाय मला घरकामात, सफाईकामातही मदत करतो. माझ्यासाठी कधी कधी जेवणही बनवतो. लग्नानंतर एक वर्ष झाले आमच्याच कधीही भांडण झाले नाही. मी भांडणासाठी तडफडत असते, परंतु रोमॅन्टिक पतीसोबत भांडण होणे कधी होणे शक्य नाही. कारण तो नेहमीच मला माफ करतो आणि माझ्यासाठी वेगवेगळ्या वस्तू उपहार म्हणून घेऊन येतो. मी खरंच त्याच्यासोबत भांडण करू इच्छिते. कोणतीही अडचण, वाद नसणारे जीवन मला नको आहे’, असे म्हणत पत्नीने घटस्फोट मागितला आहे.

मी काहीही चुकीचे केलेले नाही. फक्त एक आदर्श पती बनावे माझी इच्छा होती, असे महिलेच्या पतीने म्हटले आहे. तसेच न्यायालयाने महिलेला खटला मागे घेण्यास सांगावे अशी विनंतीही तिच्या पतीने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या