बार्सिलोनाला ऐतिहासिक विजेतेपद

बार्सिलोना क्लबने कारकिर्दीत पहिल्यांदाच यूईएफए महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला. किताबी लढतीत त्यांनी चेल्सी क्लबचा 4-0 गोल फरकाने धुक्वा उडवीत ही ऐतिहासिक कामगिरी केली. बार्सिलोना पुरुष आणि महिला गटात चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकणारा पहिलाच क्लब ठरलाय, हे विशेष.

2016 ते 2020पर्यंत सलग पाच किताब जिंकणाऱया लियोन क्लबचे यंदा उपांत्यपूर्व फेरीतच आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे या वेळी नवा संघ चॅम्पियन होणार हे निश्चित झाले होते. अंतिम लढतीत बार्सिलोनाने पहिल्या मिनिटापासून चेल्सीवर वर्चस्व गाजवले. लढत सुरू झाल्यानंतर काही सेंकदांतच लिके मार्टेस हिच्या शॉटवर ल्युपोल्जने किर्बीच्या मदतीने गोल करून बार्सिलोनाचे खाते उघडले.

14व्या मिनिटाला एलेक्सिया पुटेल्स हिने पेनल्टीवर गोल करून बार्सिलोनाची आघाडी 2-0ने वाढविली. त्यानंतर बोनमतीने 20व्या मिनिटाला गोलरक्षक एन पॅटरीन बर्जर हिला चकवा देत बार्सिलोनासाठी तिसरा गोल केला. मग ग्राहम हेन्सन हिने 36व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाची आघाडी 4-0 अशी भरभक्कम केली. बार्सिलोनाने मध्यंतरापूर्वीच हे चारही गोल केले.

जेतेपद मिळविणारा पहिला स्पॅनीश महिला क्लब

बार्सिलोना महिला क्लब यूईएफए महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा पहिला स्पॅनीश महिला क्लब ठरला आहे. 2009-10नंतर अंतिम लढतीत 4-0 गोलने मिळविलेला सर्वात मोठा विजय होय. दोन वर्षांपूर्वी बार्सिलोनाला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्या वेळी त्यांना लियोन क्लबकडून 1-4 गोल फरकाने हार पत्करावी लागली होती.

आपली प्रतिक्रिया द्या