भोंदूबाबांची यादी जाहीर करणारे महंत मोहनदास यांचे अपहरण

सामना प्रतिनिधी, नाशिक

राम रहीम, निर्मल बाबा, आसाराम बापू, राधे माँ यांच्यासह चौदा भोंदूबाबांची यादी जाहीर करणारे साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत मोहनदास बारा दिवसांपासून बेपत्ता असल्याने एकच खळबळ उडाली आहे. भोंदूबाबांच्या गुंड टोळीने त्यांचे अपहरण केल्याचा दावा आखाडा परिषदेतील साधू-महंतांनी केला आहे. झारखंड व महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने त्यांचा त्वरित शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि श्री पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे १५ सप्टेंबर रोजी रेल्वेने उपचारासाठी मुंबईकडे निघाले होते. प्रवासादरम्यान दोन तासानंतर त्यांचा मोबाईलचा संपर्क तुटला, आजपर्यंत त्यांचा संपर्क होवू शकलेला नाही. महंत मोहनदास यांनी १० सप्टेंबरला राम रहीम, आसाराम बापू, निर्मल बाबा, राधे माँ यांच्यासह चौदा बाबा हे भोंदू असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने भोंदूबाबांच्या गुंडांच्या टोळीने त्यांचे अपहरण केले असावे, असा संशय साधू-महंतांनी व्यक्त केला. यासंदर्भात हरिद्वार येथे आखाड्यांच्या साधू-महंतांची एक बैठक झाली.

सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे जव्हार रोडवरील आश्रमात अखिल भारतीय षङ्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महंत मोहनदास यांचे अपहरण झाल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला. त्याप्रसंगी महामंत्री महंत हरिगिरीजी, महंत शंकरानंद सरस्वती, निर्मल आखाड्याचे महंत राजेंद्र सिंह, अग्नि आखाड्याचे महंत अभयानंद ब्रह्मचारी, जुना आखाड्याचे महंत सुशीलगिरी, अटल आखाड्याचे महंत उदयगिरी, श्री पंचायती आखाडा बडा उदासीनचे महंत बालकदास, नया उदासीनचे महंत विचारदास, आवाहनचे महंत आनंदपुरी, निर्वाणीचे कमलगिरी, महानिर्वाणीचे मंगलपुरी महाराज, निरंजनीचे महंत धनंजयगिरी, निर्मल आखाड्याचे महंत निर्मल बाबा आदी साधू-महंत या बैठकीला हजर होते.

साधू-महंत असुरक्षित – बिंदू महाराज
हिंदुस्थानात खरे साधू-महंत असुरक्षित आहेत, हे या घटनेवरून समोर येत आहे, असा आरोप अखिल भारतीय षङ्दर्शन आखाडा परिषदेचे प्रवक्ते, महंत डॉ. बिंदू महाराज यांनी केला आहे. साधू-महंतांच्या सुरक्षेची जबाबदारी ही शासनाची असल्याचे ते म्हणाले.