…तर सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणुन मुंबईकरांना आणण्यासाठी पुढे असेन : उदय सामंत

911

कोरोना विषाणूच्या परिस्थितीत कोणीही राजकारण करू नये. अशा राजकारणामुळे संभ्रम निर्माण होत आहे. शासन ज्यावेळी मुंबईकर चाकरमान्यांना गावी आणण्याबाबत निर्णय घेईल त्यावेळी सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणुन मी स्वतः मुंबईकरांना गावी आणण्यासाठी पुढाकार घेईन असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकोरकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अमरसेन सावंत, अतुल बंगे, संजय भोगटे, राजन नाईक, सचिन काळप, सुशिल चिंदरकर, राजु गवंडे आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्गात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या मुलीबाबात सांगताना सामंत म्हणाले की, मुंबईहून आपल्या कुटूंबीयांसमवेत रितसर पास घेवून आलेल्या त्या मुलीला क्वारंटाईन करण्यात आले होते. ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली पण आमची अपेक्षा आहे की, तीचा अहवाल लवकरच निगेटिव्ह येईल. पण या गोष्टीच राजकारण कुणी करू नये. त्या मुलीला मुद्दाम सिंधुदुर्गात आणल गेलं. अशा अफवा चुकीच्या आहेत. अशा अफवांमुळे मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. आज केंद्राने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय पालकमत्र्यांचा नाही. सत्ताधारी परप्रांतियांना नेत आहेत पण मुंबईकरांना आणत नाहीत असे आरोप केले जात आहेत. परंतू असे राजकारण कोणीही करू नये. हा मित्रत्वाचा विरोधकांना सल्ला आहे. राजकारण कुणाला समजत नाही, असं कुणी समजु नये, कारण आम्ही सुद्धा राजकारणात मुरलेलो आहोत. राजकारणात कुणीही कच्चे नाहीत. सिंधुदुर्गातील मुंबईत अडकलेल्या 34 विद्यार्थ्यांबाबत फोन आला होता. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याबाबत आम्ही यापुर्वीच त्या विद्यार्थ्याना कसं आणायच? याबाबत चर्चा केली होती. बॉम्बे हॉस्पिटलने सुध्दा त्या विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडे जाण्याची परवानगी दिली पण आताच्या परिस्थितीत ती मुले नातेवाईकांकडे जाणे योग्य नाही. सिंधुदुर्गात एक रूग्ण पॉझिटिव्ह मिळाला तरी तो आकडा शुन्यावर येण्यासाठी आमचे प्रशासन सज्ज आहे. आता पासधारक देखील कमीत कमी कसे येतील यासाठी प्रशासन काम करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

…तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार !
सोशल मिडीयावर खोट्या बातम्या पसरविण्याचा या पुढे जर कुणी प्रयत्न केला तर त्यांच्या मुळाशी जावून संबंधितांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. याबाबत आपण आमच्या विभागाशी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना सांगितले आहे. पोलिस विभाग तर अशा पोस्टच्या मुळापर्यंत नक्कीच पोहचणार असल्याचे यावेळी सामंत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या