गँगरीन झाल्यावर शरीराचा भाग कापून काढतो तसे पक्षातून कापून फेकून द्या! उदयनराजे यांनी कोशियारी, त्रिवेदींचे केले ऑपरेशन

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे विकृत आहेत. अशा विकृत लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. आपल्या शरीराला गँगरीन झाल्यावर ज्याप्रमाणे आपण शरीराचा भाग कापून काढतो, तसेच त्रिवेदी आणि कोश्यारी यांना पक्षातून कापून फेकून दिलं पाहिजे अशी जळजळीत टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

वसईत मराठा उद्योजक लॉबीच्या वर्धापन दिनासाठी उदयनराजे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय समाज कार्य आणि राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. राज्यपालपद हे सन्मानाचे पद आहे त्यामुळे आपण काय बोलतो हे कोश्यारींना कळायलाच हवे. त्यांनी हे एकदा नव्हे तर दोनदा केले आहे, असे ते यावेळी म्हणाले.

त्रिवेदी यांच्यावर जळजळीत टीका करताना उदयनराजे म्हणाले की, तो कोण कुठला थर्ड क्लास भिकारडा सुधांशू त्रिवेदी? असे विकृत लोक शिवाजी महाराजांविरुद्ध बरळत असतात. या दोघांनाही छत्रपती शिवरायांची माफी मागायला लावा आणि पदावरून, पक्षातून काढून टाका अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहे. अन्यथा माझी पुढची वाटचाल काय असेल ते मी त्यावेळी सांगेन असा इशाराही उदयनराजे यांनी दिला.