चुक‍ा घडल्या पण पाठीत खंजीर खुपसला नाही! उदयनराजेंचे पवारांना प्रत्युत्तर

8413

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली. ‘लोकांनी आमच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केले, देशात केवळ 4 खासदार निवडून आले बाकीचे पडले, तुमचा पुतण्या मुतायची भाषा करतो आणि तुम्ही त्यावर पांघरूण घालता, राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गफला होतो आणि तुम्ही भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करता, यात आमची चूक होती का? अशा शब्दात उदयनराजे यांनी पवारांवर निशाणा साधला.

साताऱ्यात भर पावसात झालेल्या सभेत पवारांनी उदयनराजे यांना उमेदवारी देऊन चूक केल्याचे म्हटले होते, त्याला उदयनराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘पवारसाहेब आमच्याकडून चुका घडल्या असतील परंतु कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही’ अशी बोचरी टिकाही भाजप-शिवसेना महायुतीचे लोकसभेतील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केली. शिवसेनेचे धैर्यशील कदमच कराड उत्तरचा उद्याचा आमदार असेल, अशी खात्रीही त्यांनी जनसमूदसयासमोर दिली. मसुर (ता.कराड) येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते.

उदयनराजे यांनी पवारांना सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, ‘370 कलमाला विरोध करून तुम्हीं शहिदांच्या जखमांवर मीठ चोळले, सातारचे पाणी बारामतीला वळवले, केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले. इतकी वर्षे मराठा आरक्षणाची फरपट केली. तुमच्या माणसांनी भ्रष्टाचार करून राज्य सहकारी बँक रसातळाला नेली, यामध्ये आमची काय चूक होती. जनतेचे कुठे चुकले याचा जबाब शरद पवार यांनी सर्वांसमोर द्यावा. आम्ही खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणतो, पवारसाहेब तुम्ही उभे राहणार असाल तर मी लढत नाही अशी भूमिका घेतली. तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा नेहमीच आदर केला आणि यापुढेही करेन. कौरवांची साथ सोडून पांडवांमध्ये हे सहभागी झालो लबाडांची साथसंगत सोडली यात आमची काय चूक होती.’

udayanraje

साताऱ्यात झालेला पाऊस हा शुभशकुन नव्हे तर त्यांची घाण धूऊन टाकण्याचे संकेत आहेत. याची सुरुवात सातारा राजधानीत झाली, याचा मला अभिमान आहे असे सांगून उदयनराजे यांनी भाषणाचा रोख राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्याकडे वळवला. ‘कालची सभा म्हणजे काळूबाळूचा तमाशा होता. ढगाला लागली कळं, राष्ट्रवादीची मतं गळं आणि धनुष्यबाण व कमळ फुलं. राज्याचं दिवाळं निघाले तरी त्यांच्या हाती राज्य सोपवा असे पवारसाहेब म्हणत असतील तर माझी चूकच आहे. त्यांच्या चुकांचे खापर आमच्या माथी फोडू नका. जनताजनार्दन या सगळ्या चुकांची दुरुस्ती महायुतीच्या बाजूने कौल देऊन करेल, असा विश्वासही उदयनराजे यांनी व्यक्त केला.

‘केंद्रात महायुतीचे सरकार आहे, राज्यातही महायुतीच येणार आहे. त्यामुळे उत्तरमधून महायुतीचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून विधानभवनावर पाठवून परिवर्तनाच्या लाटेत सिंहाचा वाटा उचलावा, असे आवाहन उमेदवार धैर्यशील कदम यांनी येथे केले.

आपली प्रतिक्रिया द्या