लोकसभा पराभवानंतर गायब झालेले माजी खासदार उदयन भोसले ‘बाहेर’ पडले

1795
udayanraje-bhosale

छत्रपती शिवाजी महाराज यांची उंची कोणीही गाठू शकणार नाही. फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ‘जाणता राजा’ होते. मात्र, अलीकडे ‘जाणता राजा’ ही उपमा दिली जाते, त्या जाणत्या राजांना राजकारणाशिवाय काही पडलेले नाही. ‘जाणता राजा’ उपमा देणे गैरच आहे, अशी टीका सातारचे माजी खासदार उदयन भोसले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव न घेता केली.

भाजप नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील भाजपच्या कार्यालयात झाले. त्यानंतर राज्यासह देशात संतापाची लाट उसळली आहे. यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उदयन भोसले बोलत होते. या पुस्तकाविषयी आक्षेप घेत बोलताना उदयन भोसले यांनी शिवसेना आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही तोंडसुख घेतले. ‘शिव’ या नावावरूनही आगपाखड करीत तुमच्या संघटनेच्या नावामधून ‘शिव’ काढणार का? असा सवाल केला. तर, शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका करताना ‘जाणता राजा’ ही उपमा देण्यावरच आक्षेप घेतला.

खासदारकी गेली तरी आपल्याला फरक पडत नाही. स्वतःला मनापासून जे पटते त्यावर विचार करूनच निर्णय घेतो, त्यामुळेच खासदारकीचा राजीनामा दिला. आता खासदारकी असो वा नसो लोकांची सेवा करणार, असेही उदयन भोसले यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आज सोयीप्रमाणे घेतले जात आहे. त्यांचे विचार आत्मसात केले असते, तर आज ही स्थिती नसती. महाराजांच्या नावाचा सर्वांनी खेळखंडोबा केला असून, याची किळस वाटते, असे सांगत उदयन भोसले म्हणाले, ‘गोयल नावाच्या कुण्या लेखकाचे मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मी ते वाचलेले नाही. एक युगपुरुष कधीतरी जन्माला येतो. ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आहेत. या पुस्तकामुळे माझ्यासह महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच वाईट वाटले. राजेशाहीने वाटचाल केली, तर गोयलला पुस्तकाआधी ‘विथड्रॉ’ करीन, असा इशाराही त्यांनी दिला.’

शिवसेनेचे हिंदुत्व धर्मनिरपेक्ष

भाजप आणि शिवसेना हिंदुत्ववादी असले तरी त्यांच्या हिंदुत्ववादात फरक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे धर्मनिरपेक्ष असल्याचे मत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. मनुवादी हिंदुत्व हे समानता, धर्मनिरपेक्षता हे मूल्यं नाकारत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, शिवसेनेच्या हिंदुत्वात धर्मनिरपेक्षतेचे मूल्य आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा शिवसेनेकडे असल्याचे कवाडे म्हणाले.

जाणता राजा पवारच

होय शरद पवार हे जाणता राजा आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न असो की शेतकरी मजुरांचे, साऱ्यांचे प्रश्न सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही त्यांच्याकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेत. शिवाय, जसे अनेकजण त्यांच्या करंगळीचा वापर करून राजकारणात आले, असा टोला आव्हाड यांनी पवारांकर टीका करणाऱ्यांना लगावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या