व्हिडीओ-शिवसेनेच्या शाखा ही समाजसेवेची मंदिरे-उद्धव ठाकरे

104

शिवसेनेच्या शाखा या समाजसेवेसाठी आहेत. ही जनसेवेची परंपरा अखंडित आहे. ही समाजसेवेची मंदिरे आहेत असे जबरदस्त प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. डोंबिवली येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. गोग्रासवाडी येथे हा कार्यक्रम झाला. गोग्रासवाडी जनसंपर्क कार्यालयसुद्धा समाजसेवेची परंपरा कायम ठेवेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

व्हिडीओ सौजन्य-प्रदीप भणगे

शिवकालीन आरमाराचे संग्रहालय लवकर उभारा!

देशातील पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ छत्रपती शिवरायांनी कल्याणमध्ये रोवली. या आरमाराचा स्वराज्य स्थापनेत मोलाचा वाटा आहे. शिवसेनेच्या वचननाम्यातही आरमाराचे संग्रहालय उभारण्याचे वचन दिले आहे. हे संग्रहालय लवकरात लवकर उभारा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

९२ च्या दंगलीत मुंबई वाचवली ती शिवसेनाप्रमुखांनी 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मुंबई ही मराठी माणसाची. त्याने ती बलिदान देऊन मिळवली. पण नंतरचा काळ असा आला की मराठी माणूस उपरा होतो की काय? पण त्याला ताकद दिली ती बाळासाहेबांनी. १९९२-९३ च्या मुंबई दंगलीत बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसैनिकाने मुंबई वाचवली. हा दरारा आणि दहशत गुंड आणि देशद्रोह्यांवर जरब बसविणारी होती.

शिवसेनाप्रमुखांचे भाषण आणि व्यंगचित्र गॅलरी

येथे शिवसेनाप्रमुखांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची गॅलरीही उभारण्यात आली असून संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचा इतिहासही चित्ररूपाने या दालनात साकारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या जबरदस्त भाषणांतील काही अंश ऐकण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली असून शिवसेनाप्रमुखांचे चरित्र, फोटो गॅलरी, तैलचित्र आणि म्युरल्स येथे मांडण्यात आली आहेत.

तुम्ही तर मुंबईच्याही पुढे गेलात

एकीकडे शिवसेनाप्रमुखांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण होत आहे आणि दुसरे म्हणजे आजच शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी जागेचे हस्तांतरण झाले आहे. म्हणजेच तुम्ही मुंबईच्याही पुढे गेलात अशी शाबासकीची थाप कल्याण-डोंबिवलीवासीयांच्या पाठीवर दिली. केवळ बाळासाहेबांचा पुतळा उभा करणे हा स्मारकाचा हेतू नाही किंवा ते प्रेक्षणीय स्थळ म्हणूनही हा पुतळा उभारलेला नाही. जशी सूर्याकडून अखंड ऊर्जा मिळते तशीच इथे येणाऱया प्रत्येकाला हे स्मारक ऊर्जा देईल. यामुळे मला या स्मारकाचा अभिमान आहे. देशात सध्या नैराश्येची स्थिती असताना बाळासाहेबांची स्मारके जिह्याजिह्यात झाली पाहिजेत. यातून समाजाला नवी चेतना आणि ऊर्जा मिळेल असा जबरदस्त विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या