शिवशक्ती-भीमशक्तीसोबत आता लहूशक्ती! उद्धव ठाकरे यांची घोषणा

शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहूशक्ती ही एकाच शक्तीची रूपे आहेत. या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रात नव्हे, तर देशात एक प्रचंड ताकद निर्माण होईल. म्हणूनच शिवशक्ती-भीमशक्ती व लहूशक्तीचा लवकरच मेळावा घेणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंतीनिमित्त मातंग समाजाच्या वतीने वांद्रे येथील शासकीय वसाहतीमधील कम्युनिटी हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आज लहूशक्ती माझ्यासोबत आहे. तुम्ही माझ्याकडे काही मागण्या केल्या नाहीत, पण हा समाज आतापर्यंत दुर्लक्षित राहिला हे मीही मान्य करतो. मात्र या समाजाला मी वेगळे कधीच मानले नाही. नेहमी आपलेच मानले.

आज आपण लहुजी साळवे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयजयकार करतो. पण अण्णाभाऊ साठेंनी मर्दुमकीने शाहिरी केली तेव्हा अण्णाभाऊ साठे यांनी गिरणी कामगारांना चेतवले आणि पेटवले. मग संघर्ष उभा राहिला. तो संघर्ष तेव्हा उभा राहिला नसता तर आपली मुंबई आपली राहिली नसती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई ताब्यात ठेवायची आहे

अण्णाभाऊंनी मुंबईसाठी लढा दिला, पण त्यांचे मुंबईत स्मारक नाही. ही आपल्या सर्वांसाठी लाजेची गोष्ट आहे. मग मागणी पूर्ण करणार कोण? आज ते सत्तेवर बसले आहेत त्यांना अण्णाभाऊंचे महत्त्व समजणार आहे का आणि कळले तरी अण्णाभाऊंचे स्मारक बांधणार आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. अण्णाभाऊ साठे यांनी मिळवून दिलेली मुंबई आपल्याला आपल्या ताब्यात ठेवायची आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

थाप डफावरची आणि आताच्या मंत्र्यांची थाप

अण्णाभाऊ साठे यांनी डफावर मारलेल्या थापेचा गौरवाने उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डफावर थाप मारली, पण आपल्या मंत्र्यांच्या आताच्या थापा वेगळय़ा आहेत. मीही मुख्यमंत्री होतो, पण आम्ही कधी थापा मारल्या नाहीत. कारण आज भूलथापा मारायच्या, सर्वांना संमोहित करायचे आणि सत्ता बळकवायची. पण हे पाप आपण कधीच केले नाही.

घराबाहेर पडल्याने त्यांच्या पोटात गोळा

बुलढाण्यात शेतकऱयांची सभा घेतली. आता शिवशक्ती- भीमशक्ती आणि लहूशक्तीचा आपण लवकरच मेळावा घेणार आहे असे सांगताना ते म्हणाले की, दोन-अडीच वर्षे कोरोनाचा कालखंड होता. त्यानंतर सहा महिने माझ्या शस्त्र्ाक्रियेमुळे घरी होतो. मी आता बाहेर पडायला लागलो. पण मी जेव्हा घराबाहेर पडत नव्हतो तेव्हा मी घराबाहेर पडत नाही म्हणून बोलत होते. आता घराबाहेर पडलो तर त्यांच्या पोटात गोळा आला, असा सणसणीत टोला त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱयांना लगावला.

शिवरायांचा अवमान करणाऱया भाजपला सुनावले खडे बोल

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य आणि त्यापाठोपाठ पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजही त्यांना जुना आदर्श वाटायला लागले. मुंबईतल्या एका मंत्र्याने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेशी केली. पण शिवाजी महाराज आग्र्याहून आल्यावर त्यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली नसती तर आज हे तुलना करणारे कुठेतरी कुर्निसात करताना दिसले असते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पर्यटनमंत्र्यांचा समाचार घेतला.