गुजरात विजयाबद्दल उद्धव ठाकरेंकडून भाजपचं अभिनंदन, हिमाचल विजयासाठी काँग्रेसला दिल्या शुभेच्छा

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे अभिनंदन केलं आहे. मात्र यावेळी महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचाही उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात ‘गुजरात विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे अभिनंदन केले.

गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश विधान सभेचे निकाल लागले व तेथे काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. तर दिल्ली ‘मनपा ‘ निवडणुकीत ‘आप’ने भाजपवर मात केली. याबद्दलही ठाकरे यांनी काँग्रेस व आपचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

गुजरात विजयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गुजरातचा निकाल अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते.’
उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, ‘पंतप्रधान मोदी हे 11 तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील ही अपेक्षा. आपने गुजरातेत मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे स्पष्टही झाले. असो, ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते.’