देशभक्त रांगेत आणि दहशतवाद्यांना घरपोच मदत, उद्धव ठाकरे यांचा टोला

सामना ऑनलाईन। मुंबई

चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांला ‘सामान्य नागरिक’ ठरवत त्याला आर्थिक मदत देण्याच्या जम्मू कश्मीर सरकारच्या निर्णयावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परखडपणे भाष्य करताना म्हटले आहे की देशभक्त हे बँकांबाहेर पैशांसाठी रांगेत उभे आहेत आणि दहशतवाद्यांना मात्र घरपोच आर्थिक मदत दिली जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की ज्यांचा दोष नाही त्यांना त्रास दिला जात आहे आणि याला आपण स्वातंत्र्य कसे काय म्हणू शकतो?

नोटाबंदीबाबात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की जिल्हा बँका सहकारी बँकांमध्ये शेतकऱ्यांचे पैसे आहेत. या बँकांवर निर्बंध लावून काय मिळवलं असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. विजय मल्ल्या याने काय जिल्हा बँकेतून कर्ज घेतले होते काय असं विचारत त्यांनी अॅक्सिस बँकेत पण घोटाळा झाला मात्र त्या बँकेला क्लीन चीट दिली याकडे लक्ष वेधलं.

संसदेत गोंधळामुळे कामकाज होत नाहीये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी दोघेही आपल्याला बोलू दिलं जात नाही असं म्हटतायत, याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं की कोणी बोलत नाहीये, मात्र जनता सगळं ऐकतेय, जनता आंधळी नाहीये तिला सगळं दिसतंय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हेमराज शहा, जयंतीभाई मोदी आणि भाजपचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी यांच्यासह गुजराती समाजातील अनेक लोकांनी शिवसेनेत प्रेवश केला. या प्रवेशाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेनेबाबत अनेकदा गैरसमज पसरवले गेले, बाळासाहेबांना नेहेमी वाटायचं की गुजराती समाज हा शिवसेनेसोबत आला पाहिजे. जे नात आज गुजराती समाजाबाबत निर्माण झालं आहे ते दिवसागणिक अधिक दृढ होत जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या