राज्याचे मुख्यमंत्री न्यायाने वागत नाहीत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच सध्या राज्यात लाडका कंत्राटदार आणि लाडका उद्योगपती योजना सुरू आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईत आझाद मैदानात सरपंच संघटनेचं अनेक मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, आता सरकारचे प्रतिनिधी येतील आणि लाडका सरपंच घोषणा करतील. यांचे लाडके कंत्राटदार वेगळे आहेत. लाडका कंत्राटदार, लाडका उद्योगपती सुरू आहेत. निवडणूक आली की सगळे सरकारी पोपट बोलायला लागतात. पण नुसत्या घोषणा करून चालणार नाहीत, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.
तसेच तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यात विमा संरक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे. सुधारित वेतनश्रेणी आणली आहे, पण ज्यांच्यासाठी आणली आहे त्यांना मान्य आहे का? आमच्या शब्दावर विश्वास आहे का हा प्रश्न तुम्हाला विचारत आहे. तरच हे नातं पुढे जुळेल. सरकार योजनांचे पैसे कसे मतांसाठी फिरवत आहेत बघा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आमचे सरकार यावे म्हणून आम्ही इथे आलेलो नाही. पण तुमच्या व्यथा आणि वेदना या फक्त कागदावर न राहता, मैदानावर न राहता प्रत्यक्षात अंमलबजावणी आणण्यासाठी हे सरकार उलथवून टाकुया. तुम्ही सरपंच म्हणजे आपल्या गावांचे प्रमुख म्हणून इथे आला आहात. कोरोनोच्या काळात मी 28 ते 30 हजार सरपंचांसोबत संपर्क साधला होता. सरपंच गावातले मुख्यमंत्री आहेत, ते न्यायाने वागतात. पण राज्याचे मुख्यमंत्री न्यायाने वागत नाहीत. तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार आल्यानंतर आम्ही पूर्ण करू. लढत राहू आणि महाराष्ट्राला कलंक लागलेला पुसून टाकू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.