मुंबईकरांचे शिवसेनेशी अतिशय घट्ट नाते आहे. त्यामुळेच मुंबई पदवीधर मतदारसंघातून गेल्या पाच वेळा पदवीधर मतदारांनी त्यांचे आशीर्वाद मतांच्या रूपाने शिवसेनेला दिले आहेत. त्यामुळे यावेळीही मुंबईतील पदवीधर मतदार शिवसेनेच्याच पाठीशी उभे राहतील, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अॅड. अनिल परब यांच्या ‘संकल्पपत्रा’चे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिदषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, या मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांनी प्रतिनिधित्व केले होते. नवलकर यांनी अत्यंत सुसंस्कृतपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. मी मुंबईतल्या पदवीधर मतदारांना विनंती करतो की, ज्याप्रमाणे मागील पाच निवडणुकांमध्ये पदवीधर मतदारांचे आशीर्वाद मतांच्या रूपाने शिवसेनेला दिले आहेत, त्याचप्रमाणे यावेळीही त्यांची साथ मिळावी. यामुळे शिवसेना आणि मुंबईशी असलेले नाते अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पदवीधरांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवणार
सुशिक्षित मतदारांचे काही वेगळे प्रश्न असतात. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनाही प्रश्न भेडसावत असतातच, मात्र पदवी मिळाल्यावर पुढे काय करायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढेही उभा असतो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना शिवसेनेने पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. आताही पदवीधरांच्या ज्या काही समस्या आहेत त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू.
मतदान करून कामावर जा
पदवीधर मतदारसंघाचे मतदान 26 जून रोजी आहे. सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे मतदानासाठी सुट्टी नाही. तो कामाचा दिवस आहे. त्यामुळे सर्व पदवीधर मतदारांनी कामाला जाण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य बजावून शिवसेनेला मतदान करून कामावर जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विक्रमी मताधिक्य कायम राहणार – अॅड. अनिल परब
यावेळी बोलताना अॅड. अनिल परब म्हणाले की, मी शिवसेनेचा आमदार म्हणून तीन वेळा विधान परिषदेत काम केले आहे. यावेळी मी प्रथम पदवीधर मतदारसंघात उभा आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात प्रचंड मताधिक्याने निवडून येण्याचा शिवसेनेचा विक्रम आहे. 98 टक्के इतके विक्रमी मताधिक्य शिवसेनेने या मतदारसंघात मिळवलेले आहे. यावेळीसुद्धा मोठे मताधिक्य घेत मुंबई पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेकडेच राहील, असा विश्वास यावेळी अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केला.